Join us

आरटीईसाठी उपलब्ध जागांवर दुपटीने अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 04:47 IST

राज्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी अर्ज करण्याची २९ फेब्रुवारी ही शेवटची तारीख होती.

मुंबई : राज्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी अर्ज करण्याची २९ फेब्रुवारी ही शेवटची तारीख होती. सायंकाळी ८ वाजेपर्यंत राज्यातील ९,३३१ शाळांमधील १ लाख १५ हजार २५८ जागांसाठी तब्बल २ लाख ७५ हजार ५७८ अर्ज दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे आॅनलाइन दाखल करण्यात आलेल्या या अर्जांमध्ये १२ अर्ज हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवरून दाखल करण्यात आले आहेत. सायंकाळी ८ वाजेपर्यंत तरी राज्य सरकारकडून आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी मुदतवाढ घोषित करण्यात आली नाही. त्यामुळे पुढील प्रवेश प्रक्रिया नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.यंदा आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ११ फेब्रुवारीपासून सुरू झाली. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून तांत्रिक गोंधळ सुरू होता, तरीही पालकांची अर्जांची प्रक्रिया सातत्याने सुरू होती. सुरुवातीचे काही दिवस आरटीईचे संकेतस्थळ हँक होत असल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचण येत होती. तरीही शेवटच्या दिवसापर्यंत राज्यातील १ लाखाहून अधिक जागांसाठी दुपटीने अर्ज नोंदणी झाली आहे. अर्ज नोंदणीची प्रक्रिया आता पूर्ण झाल्यानंतर ११ व १२ मार्च असे दोन दिवस लॉटरी प्रक्रिया सुरू राहणार आहे़ यंदा ही सोडत एकदाच होणार आहे. पुढे रिक्त जागांसाठी प्रवेश यादी लावण्यात येणार आहे.>ंपहिलीच्या प्रवेशासाठी ५२०५ जागामुंबईत नोंदणी झालेल्या शाळांची संख्या यंदा वाढली आहे. मुंबई डीव्हायडी विभागात ७०, तर पालिकेच्या २९७ शाळांनी या प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यामुळे पालिका शाळांमध्ये पूर्व प्राथमिकच्या प्रवेशासाठी ५६६, तर पहिलीच्या प्रवेशासाठी ५२०५ जागा उपलब्ध आहेत. तसेच डीव्हायडी विभागाच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या शाळांमध्ये पूर्व प्राथमिकच्या ८४, तर पहिलीच्या प्रवेशासाठी १,३४७ जागा उपलब्ध आहेत. मुंबई पालिका शाळांतील जागांसाठी ११ हजार ८७८, तर डीव्हायडी विभागातील जागांसाठी १,४३१ अर्ज आले आहेत.