गर्दीच्या वेळेत दिवा स्थानकातील फाटक बंद ?
By Admin | Updated: January 6, 2015 01:28 IST2015-01-06T01:28:56+5:302015-01-06T01:28:56+5:30
मध्य रेल्वेवरील पाच फाटकांपैकी दिव्यातील फाटकामुळे मोठा लेट मार्क लागत असल्यामुळे हे फाटक सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत बंद करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे.

गर्दीच्या वेळेत दिवा स्थानकातील फाटक बंद ?
मुंबई : मध्य रेल्वेवरील पाच फाटकांपैकी दिव्यातील फाटकामुळे मोठा लेट मार्क लागत असल्यामुळे हे फाटक सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत बंद करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. त्यासाठी शासन आणि स्थानिक संस्थांशी बोलणी सुरू आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेवरील लोकलना मोठ्या प्रमाणात लेट मार्कला सामोरे जावे लागत आहे. या लेट मार्कला रूळ आणि ओव्हरहेड, पेन्टोग्राफ तुटणे, सिग्नलमधील बिघाड हे कारणीभूत असल्याचे जरी प्रथमदर्शनी दिसून आले, तरी महत्त्वाची बाब म्हणजे पाच फाटकांमुळे लोकल सातत्याने लेट धावत असल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. मेन लाइनवर कल्याण, ठाकुर्ली, आंबिवली, दिवा आणि कळवा येथे फाटक आहे. तर हार्बर मार्गावरील कुर्ल्याजवळ (एलटीटी) फाटक आहे. दिवसभरात सतत उघडणाऱ्या या सर्व फाटकांमुळे दररोज धावणाऱ्या ९0 लोकल गाड्यांचा वक्तशीरपणा बिघडत असल्याचे सांगितले जाते. रेल्वेला दिव्यातील फाटक सर्वात जास्त डोकेदुखी ठरत असून, दिवसभरात ३८ पेक्षा जास्त वेळा हे फाटक उघडते आणि त्यामुळे अनेक लोकल गाड्या अडकून राहतात. या फाटकामुळे पाचही मार्गांवर परिणाम होतो. त्यावर मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेसारखाच उपाय शोधून काढला असून, त्यावर विचारविनिमय सुरू आहे.
पश्चिम रेल्वेवर काही ठिकाणचे फाटक सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत बंद ठेवले जातात. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी लोकल वेळेत धावतात आणि कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांनाही लेटहोत नाही. मध्य रेल्वेही दिवा स्थानकातील फाटक गर्दीच्या वेळेत बंद ठेवण्याचा विचार केला जात आहे. यासाठी राज्य शासन आणि स्थानिक संस्थांशी बोलणी सुरू आहेत. याबाबत मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनीही दिव्यातील फाटक गर्दीच्या वेळेत बंद करण्याचा विचार केला जात असल्याचे सांगितले.
२ जानेवारी रोजी ठाकुर्लीजवळ पेन्टाग्राफ तुटून झालेल्या घटनेनंतर दिव्यात प्रवाशांचा उद्रेक झाला. त्यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द केला. या फाटकामुळे १ जानेवारी रोजी तब्बल ११४ गाड्यांना लेट मार्कला सामोरे जावे लागल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. तर ३ जानेवारी रोजी एका रिक्षाने फाटकाच्या गेटलाच ठोकर दिल्याने समस्यांना त्या दिवशी रेल्वेला सामोरे जावे लागले होते.