एप्रिलनंतर उघडणार 'रवींद्र'चा दरवाजा! १०० कोटी रुपये खर्च; ४०-४५ टक्के नूतनीकरणाचे काम पूर्ण

By संजय घावरे | Published: January 29, 2024 07:22 PM2024-01-29T19:22:13+5:302024-01-29T19:24:53+5:30

मागच्या वर्षी १४ नोव्हेंबरपासून नूतनीकरणाच्या कामासाठी बंद असलेले रवींद्र नाट्य मंदिरचा दरवाजा उघडण्यासाठी रसिकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

door of Ravindra will open after April 100 crore expenditure 40-45 percent renovation work completed | एप्रिलनंतर उघडणार 'रवींद्र'चा दरवाजा! १०० कोटी रुपये खर्च; ४०-४५ टक्के नूतनीकरणाचे काम पूर्ण

एप्रिलनंतर उघडणार 'रवींद्र'चा दरवाजा! १०० कोटी रुपये खर्च; ४०-४५ टक्के नूतनीकरणाचे काम पूर्ण

मुंबई: मागच्या वर्षी १४ नोव्हेंबरपासून नूतनीकरणाच्या कामासाठी बंद असलेले रवींद्र नाट्य मंदिरचा दरवाजा उघडण्यासाठी रसिकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. यंदा एप्रिल अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीला नाट्यगृहाचा दरवाजा रंगकर्मी आणि रसिकांसाठी उघडणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने मागच्या वर्षी रवींद्र नाट्य मंदिराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. १४ नोव्हेंबरला पु. ल. महोत्सव झाल्यानंतर नाट्यगृह बंद ठेवण्यात आले होते.

त्यावेळी ८ मार्च २०२४ पर्यंत नाट्यगृह पुन्हा सुरू करण्याची योजना होती, परंतु काही कारणांमुळे ही डेडलाईन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. एक काम करताना समोर येणारी इतर बरीच लहान-सहान कामेही तात्काळ पूर्ण करण्यात येत असल्याने मुख्य कामांना थोडा विलंब होत आहे. याचा परिणाम नूतनीकरणाच्या संपूर्ण कामावर होणार आहे. संपूर्ण सोयीसुविधांनी सुसज्ज नाट्यगृह आणि अकादमीची इमारत रसिकांच्या सेवेत रुजू करण्याचा विचार असल्याने त्या दृष्टिने वेगात कामे पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती अकादमीशी निगडीत अधिकाऱ्याकडून मिळाली आहे. पु. ल. महोत्सवानंतर नूतनीकरणासाठी रवींद्र नाट्य मंदिर बंद ठेवण्यात आले होते, पण सरकारी कचेरीतील कामकाज पूर्ण होऊन नूतनीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला डिसेंबरमध्ये सुरुवात करण्यात आली होती. 

१०० कोटी रुपये खर्च...
नूतनीकरणासाठी शासनाने प्राथमिक पातळीवर ७० कोटी रक्कम मंजूर केले असून, वाढीव ३० कोटी रुपयांना मान्यता दिली आहे. या कामावर एकूण १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नूतनीकरणावरील खर्चाचा भाग पीडब्ल्यूडीकडे आहे. १०० कोटींमधून काँन्टिंजन्सी, जीएसटी, हँडलिंग चार्जेस असे २५ ते ३० टक्के विविध कर-शुल्क वजा केल्यानंतर उरलेली रक्कम प्रत्यक्ष खर्च केली जाते.

४०-४५% काम पूर्ण...
संकुलाच्या संपूर्ण इमारतीचे आतून-बाहेरून वॅाटरप्रूफिंगसह प्लॅस्टर सुरू आहे. खुल्या भागातही एक व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे. मुख्य नाट्यगृहात आरामदायक आसनव्यवस्था, दिव्यांगसाठी विशेष सोय, ग्रीनरुम्स अधिक सुसज्ज, वॅाशरुम्समध्ये सुधारणा, अंतर्गत सजावट, स्टेज ड्रेपरी, एलईडी स्क्रीन्स, कॅास्टिक्स नवीन करण्यात येत आहे. साऊंड सिस्टीमसाठी डिशनल व्यवस्था केली जाणार आहे. २० वर्षे जुनी वातानुकूलित यंत्रणा बदलण्यात येत आहे. वेगवेगळ्या स्तरांवरील कामे वेगवेगळ्या टप्प्यांपर्यंत पूर्ण झालेली असल्याने सरासरी ४०-४५% काम पूर्ण झाले आहे.

Web Title: door of Ravindra will open after April 100 crore expenditure 40-45 percent renovation work completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई