Join us  

भाजपला फायदा होईल अशा आघाड्या करू नका; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 9:31 AM

पवार यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली.

- अतुल कुलकर्णीमुंबई : जिथे फायदा होईल त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी आघाडी करा; मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजपला फायदा होईल, अशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाड्या करू नका, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिल्या आहेत. पवार यांच्या या सूचनेमुळे राष्ट्रवादी किंवा शिवसेना दोन्हीपैकी एक पक्ष भाजपसोबत जाईल का? या चर्चांना पूर्णपणे विराम मिळाला आहे.

पवार यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली. बैठकीत पवार यांनी मंत्र्यांच्या कामाचा आणि त्यांच्या विभागाचा आढावा घेतला. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करण्याला ठाम विरोध केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ओबीसींचे आरक्षण दिल्याशिवाय या निवडणुका होणार नाहीत, या भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे, असे सांगून पवार म्हणाले, ‘‘निवडणुकीत निश्चित अशी रणनीती आखूनच सामोरे गेले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत भाजपला फायदा होईल अशी कृती आपल्याकडून होऊ नये, यासाठी बारकाईने नियोजन करा. 

प्रत्येक जिल्ह्यासाठी रणनीती

प्रत्येक नेत्याकडे एका जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येईल. त्या जिल्ह्यात शिवसेना आणि काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही, याबाबत त्यांनी निर्णय घ्यावेत. निर्णय जाहीर करण्याआधी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करावी, असे सांगून पवार म्हणाले की, स्थानिक पातळीवर नेमकी परिस्थिती काय आहे? त्यानुसारच आघाडीबद्दलचे निर्णय घ्यावेत; पण विनाकारण सत्ताधारी पक्षांमध्ये कटुता निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करू नका, असे स्पष्ट आदेशही पवार यांनी दिले.

 ईडीच्या कारवाया हा भाजपचा कट

ईडीच्या कारवाईवरून बैठकीत फारशी चर्चा झाली नाही; मात्र भाजपकडून मुद्दाम कट करून कारवाया सुरू आहेत. यावर कायदेशीर लढा आपल्याकडून दिला जात आहे. तिन्ही पक्ष भाजपच्या या कटाविरुद्ध आवाज उठवण्यास सक्षम आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. महामंडळाच्या नेमणुकांविषयी चर्चा झाली असून, येत्या १५ दिवसात महामंडळाची नावे जाहीर केली जातील, असे यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र विकास आघाडी