Join us  

घाबरू नका; हवेच्या माध्यमातून कोरोना शहरभर पसरत नाही, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 1:13 AM

डॉ़ रंजन गर्गे : दरवाजे, टेबल, भांडी यातून धोका

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना चार प्रकारे पसरत असून, यात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कोरोना पसरू शकतो. अनेक विषाणू एका ड्रोपलेटच्या माध्यमातून ६ फूट अंतरापर्यंत प्रवास करू शकतात; असा कोरोना पसरू शकतो. श्वासोच्छ्वास, शिंक यात स्वतंत्र विषाणू हवेत तरंगत ३० फूट अंतरापर्यंत प्रवास करतात; असाही कोरोना पसरू शकतो.

दरवाजे, कडी-कोंडे, टेबल, भांडी, नोटांचा कागद, किराणा पार्सल्स याद्वारेही कोरोना पसरण्याची भीती असते. हवेच्या माध्यमातून कोरोना शहरभर पसरत नाही. रुग्णालयात एसी न वापरता खिडक्या उघड्या ठेवून हवा खेळती ठेवली जाते. अशा हवेतून कोरोनाचा रोगप्रसार होत नाही. एसीमध्ये हवा खेळती नसल्यामुळे रोग प्रसार होण्याची शक्यता वाढते, असे औरंगाबाद येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रंजन गर्गे यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी विज्ञान परिषदेने कोरोनावर वेबिनारचे आयोजन केले होते. या वेबिनारमध्ये औरंगाबाद येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रंजन गर्गे बोलत होते.

ते म्हणाले, भाज्या, पैसे, किराणा यातून संसर्ग होऊ शकतो. हे पदार्थ हाताळताना जर तो व्यापारी कोरोनाग्रस्त असेल किंवा कोरोनाचा वाहक असेल तर संसर्ग होऊ शकतो. पैसे आणि किराणा मालाचे पार्सल, त्याची पाकिटे यावर सॅनिटायझर शिंपडून घ्यावे आणि पाच तासांनंतर वापरावे. कारण या विषाणूचा संसर्ग संपर्क काळ साधारण पाच तासांचा असतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस