Join us  

'उडता पंजाब' सारखा 'उडता महाराष्ट्र' होऊ देऊ नका; ड्रग्स प्रकरणावरुन सत्यजित तांबेंचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 9:48 AM

पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत ड्रग्ज रॅकेट चालवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत ड्रग्ज रॅकेट चालवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरुन आमदार सत्यजित तांबे यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

एकीकडे नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा सापडला असताना दुसऱ्या बाजूला शाळेजवळील सिगारेट-तंबाखु विक्री करणाऱ्या टपऱ्या महापालिकेच्या मदतीने हटवणारे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला होणे, ही बाब चिंताजनक आहे. नाशिकच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शहरांमध्ये आणि गावागावांमध्ये विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकणार नाहीत, यासाठी काळजी घेण्याची गरज आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली.  'उडता पंजाब' सारखा 'उडता महाराष्ट्र' होऊ देऊ नका, असं आवाहन करत राज्यभरात पोलिसांनी भरारी पथकं तयार करून शाळांबाहेरील या अशा छोट्या टपऱ्या व दुकानांवर नजर ठेवावी, अशी मागणीही आमदार तांबे यांनी केली.

प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर टीका अन् राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

राज्याच्याच नाही, तर देशाच्या नकाशावर तीर्थक्षेत्र अशी ओळख असलेल्या नाशिकला लाभलेला सांस्कृतिक वारसाही थोर आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचे साठे सापडण्याच्या घटना घडल्या. यात तब्बल ३५० कोटी रुपये मूल्याचे अमली पदार्थ मुंबई आणि नाशिक पोलिसांनी जप्त केले. अमली पदार्थांचा प्रश्न फक्त एका शहरापुरता मर्यादित नसून तो राज्यभरात पसरलेला आहे. त्यामुळे  'उडता पंजाब' सारखा 'उडता महाराष्ट्र' होऊ देऊ नका, असा इशाराही आ. तांबे यांनी दिला.

मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये शाळांच्या जवळ असलेल्या पानटपऱ्या किंवा छोटी दुकाने येथे अमली पदार्थ विकण्याच्या घटना याआधी उघडकीस आल्या होत्या. शाळांमधील किशोरवयीन आणि लहान मुलांना व्यसनाधीन करून अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवण्याचे प्रकार घडले होते. पुण्यातही अशा घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एवढा मोठा साठा सापडत असेल, तर नाशिकच नाही, तर राज्यभरातील पालक, शाळा प्रशासन आणि पोलीस या सर्वांनीच सावध राहायला हवं, अशी गरजही आमदार सत्यजीत तांबे यांनी बोलून दाखवली. 

शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी सर यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिक महापालिकेला शाळांबाहेरील या सिगारेट-तंबाखु विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले होते. त्यानंतर हे ड्रगचे साठे जप्त झाले. त्या पाठोपाठ कुलकर्णी सरांवर प्राणघातक हल्ला झाला. या सर्व गोष्टी एकमेकींशी जोडलेल्या नाहीत ना, याचाही तपास होणं आवश्यक असल्याचं आ. तांबे यांनी स्पष्ट केलं.

पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणं गरजेचं आहे. त्याच प्रमाणे शाळा प्रशासनानेही त्यांच्या परिसरात काही संशयास्पद हालचाली घडतात का, याकडे लक्ष द्यायला हवं. मुंबई पोलिसांनी शाळा-महाविद्यालयांबाहेरील या पान टपऱ्यांवर धडक कारवाई करण्यासाठी भरारी पथकं स्थापन केली होती. त्याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, शहरात पोलिसांनीही अशी पथकं तयार करावी, अशी मागणीही आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.

हा देशाच्या भवितव्याला धोका!

आपला देश तरुणांचा देश असल्याचं आपण म्हणतो. पण हे तरुण अमली पदार्थांच्या विळख्यात अडकले असतील, तर त्यांची कार्यक्षमता कमी होते. सुदृढ तरुण ही देशाची खरी संपत्ती असते. अमली पदार्थांच्या व्यसनापासून आपण तरुणांना आणि खास करून शाळकरी मुलांना वाचवू शकलो नाही, तर तो देशाच्या भवितव्यासाठी मोठा धोका असेल. – आ. सत्यजीत तांबे.

टॅग्स :सत्यजित तांबेएकनाथ शिंदे