मुंबई - कुर्ला नेहरूनगर येथील शासकीय डेअरीच्या जागेवरील झाडे तोडण्यासाठी, तसेच साफसफाई करण्यासाठी आलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या कामगारांना स्थानिकांनी विरोध केला. धारावीतील झोपडीवासीयांचे पुनर्वसन या ठिकाणी करण्यात येऊ नये आणि आमचा ऑक्सिजन हिरावू नका, अशी जोरदार मागणी करत स्थानिकांनी ही निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणताना दोन आंदोलकांना ताब्यातही घेतले.
कुर्ला येथील शासकीय डेअरी प्रकल्प सुमारे दहा वर्षांपूर्वी बंद झाला आहे. सध्या या ठिकाणी कर्मचारी निवासस्थाने, एक शीतगृह, मुख्य प्रशासकीय कार्यालय तसेच डेअरीच्या अन्य सुविधा आहेत. येथील २५ एकरपैकी २१.५ एकर जागा राज्य सरकारने धारावी पुनर्वसन प्रकल्पातील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध करून दिली आहे, तर अडीच एकर जागा मेट्रो लाइन २ बी साठी मार्गिका आणि स्टेशन बांधण्याकरिता एमएमआरडीएला दिली आहे.
या परिसरात आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहोत. शासकीय डेअरीच्या जागेवर असलेल्या झाडांमुळे या परिसरात ताजी आणि स्वच्छ हवा नागरिकांना मिळते. जर ही झाडे तोडली तर आमचा ऑक्सिजनच बंद केला होईल. त्यामुळे या जागेवर झाडे तोडून पुनर्वसन करण्यास आमचा विरोध आहे.- विद्या इंगवले, स्थानिक रहिवासी
खा. गायकवाड यांच्याकडून निषेधयेथ शेकडो मौल्यवान झाडे आहेत. मात्र, ‘आरे’प्रमाणेच सुटीच्या दिवशी या झाडांची तोड करण्यात आली. त्याला विरोध करणाऱ्यांनाच पोलिसांकडून रोखण्यात आले, असा आरोप खा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
कामात अडथळा न आणण्याचे आवाहनप्रकल्पाचे कर्मचारी रविवारी साफसफाई तसेच झाडे तोडण्याचा आढावा घेण्यासाठी आले असता स्थानिक रहिवाशांनी त्यांना जोरदार विरोध केला. सरकारने ही जागा संबंधितांना दिली आहे, त्यामुळे कामात अडथळा आणू नये, असे आवाहन केले. त्यानंतर दोन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.