आजीचे यकृत नातवाला दान, तान्हुल्याला मिळाले नवजीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 02:52 IST2019-11-04T02:51:38+5:302019-11-04T02:52:06+5:30
आव्हानात्मक प्रत्यारोपणात तान्हुल्याला मिळाले नवजीवन

आजीचे यकृत नातवाला दान, तान्हुल्याला मिळाले नवजीवन
मुंबई : कोलकत्याच्या कुंडू कुटुंबीयांत पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्याला काविळीच्या बिलीयरी अट्रेसिया विकार असल्याचे निदान करण्यात आले. त्याचे वजन ५.५ एवढे होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला जीवनदानासाठी यकृत प्रत्यारोपणाशिवाय अन्य पर्याय नव्हता़ आजमितीस जगभरात कमीतकमी दहा किलो वजनाच्या बाळावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या बाळाचे वजन पाहता ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आव्हानात्मक असल्याचे डॉक्टर सांगतात. या नातवाला आई, काकी अन्य नातेवाइकांऐवजी आजीचे यकृत योग्य ठरले.
५.५ किलो वजनाच्या पीयूषवर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबईतील मुलुंड येथील रुग्णालयात करण्यात आली. कुंडू कुटुंबीयांनी त्याला दक्षिण भारतातील विविध रुग्णालयांत उपचारासाठी फिरविल्याचे सांगण्यात आले. याच दरम्यान कुंडू कुटुंबीय छत्तीसगडमधील रायपूरमध्ये ओपीडीसाठी आलेले मुलुंड येथील रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण कन्सल्टंट डॉ. स्वप्निल शर्मा यांना भेटले. बाळाच्या यकृत प्रत्यारोपणासाठी आई, काकी आणि आजी त्वरित मुंबईला दाखल झाले.
पुढील दोन आठवड्यांमध्ये मुलावर अँटीबायोटिक्स, फिजियोथेरपी आणि पौष्टिक सप्लिमेंटसह उपचार करण्यात आला. पीयूषच्या आजीची तपासणी केली असता, त्यांचे यकृत दानासाठी योग्य असल्याचे ठरविण्यात आले. लगेचच पीयूषवर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. पीयूष अनपेक्षितरीत्या लवकर बरा झाला. याविषयी डॉ. स्वप्निल शर्मा यांनी सांगितले की, प्रत्यारोपणाच्या वेळी मुलाचे वजन ५ किलो ५ ग्रॅम होते.