Join us  

मुंबई विमानतळावरुन ३९१ उड्डाणांद्वारे ४२,५०३ प्रवाशांचा देशांतर्गत प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 7:13 PM

25 मे रोजी भारतात देशांतर्गत हवाई प्रवास झाल्यापासून पहिल्या आठवडाभरात मुंबई विमानतळावर 39 उड्डाणांद्वारे 42 हजार पाचशे तीन प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे.  

मुंबई : 25 मे रोजी भारतात देशांतर्गत हवाई प्रवास झाल्यापासून पहिल्या आठवडाभरात मुंबई विमानतळावर 39 उड्डाणांद्वारे 42 हजार पाचशे तीन प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणाऱ्या व येथून उड्डाण केलेल्या एकूण 391 विमानांमधून या कालावधीत 42 हजार 500 प्रवाशांनी प्रवास केला. या 391 विमानांमध्ये 196 उड्डाणे व 195 आगमन झालेल्या विमानांचा समावेश होता.  मुंबईतून 31 हजार 665 प्रवासी दुसऱ्या शहरात गेले तर 10 हजार 838 प्रवासी मुंबईत आले. 

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या निर्देशानंतर राज्य सरकार च्या परवानगीनंतर मुंबई विमानतळावरुन दररोज 25 उड्डाणे व 25 आगमने अशा प्रकारे 50 विमानांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. सध्या मुंबई विमानतळावरुन 14 विविध सेक्टरमध्ये हवाई वाहतूक केली जात आहे. त्यामध्ये कालपासून कोलकाता व राजकोट या दोन सेक्टरचा देखील समावेश करण्यात आला.  आठवडाभरात सर्वात जास्त प्रवासी भारमान मुंबई ते दिल्ली या मार्गावर असल्याचे समोर आले. मुंबई ते दिल्ली मार्गावर आठवडाभरात 8 हजार 130 प्रवाशांनी प्रवास केला.  विमानतळावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विमानात व विमानतळावर  सोशल डिस्टन्सिंग, सँनिटायझर, मास्क व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.  मंगळवारी मुंबई विमानतळावर 50 विमानांची वाहतूक झाली. त्यामध्ये 25 आगमन व 25 प्रस्थान असा समावेश होता. सात विमान कंपन्यांनी 14 सेक्टरमध्ये ही सुविधा पुरवली. मंगळवारी 6 हजार 247 प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. त्यामध्ये मुंबईतून बाहेर जाणाऱ्या 4400 प्रवाशांचा व मुंबईत आलेल्या 1847 प्रवाशांचा समावेश होता.  

टॅग्स :विमानतळकोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस