डोंबिवलीकरांनाही मिळणार ‘मेट्रो रेल्वे’
By Admin | Updated: February 5, 2015 22:52 IST2015-02-05T22:52:03+5:302015-02-05T22:52:03+5:30
राज्यातील आघाडी सरकारने सुमारे तीन लाख ४० हजार कोटीचे कर्ज केल्याने विकासकामे करताना युती सरकारसमोर मोठे आव्हान आहे.

डोंबिवलीकरांनाही मिळणार ‘मेट्रो रेल्वे’
डोंबिवली : राज्यातील आघाडी सरकारने सुमारे तीन लाख ४० हजार कोटीचे कर्ज केल्याने विकासकामे करताना युती सरकारसमोर मोठे आव्हान आहे. असे असले तरीही मेट्रो ठाणे नव्हे तर भिवंडी, कल्याणपर्यंत आणण्यासाठी पाठपुरावा करीन, असे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. हे सरकार जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन विकास करणार, असे त्यांनी सांगितले. यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
कल्याण पूर्वेत सोमवारी ते एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी ही माहिती दिली. दहीसर -मानखुर्द आणि वडाळा -कसारावडवली या मेट्रो प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिल्याने तब्बल सात वर्षांनी का होईना परंतु, मुंबई-ठाणेकरांचा प्रवास अधिक गतीमान होणार आहे. ही सुविधा न मिळाल्याने कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवलीसह अंबरनाथ, उल्हासनगर या ठिकाणच्या तब्बल २५ लाखांहून अधिक रहीवाशांमध्ये मात्र पुन्हा एकदा सापत्न वागणूक मिळाल्याची भावना होती. त्यामुळेच मेट्रोपासून वंचित ठेऊ नये यासाठी आमदार रवींद्र चव्हाण, सुभाष भोईर, गणपत गायकवाड आणि नरेंद्र पवार यांनीही अधिवेशनात या बाबत आवाज उठवला होता.
जिल्ह्यातील रस्त्यांचाही करणार विकास :
जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था चांगली नसून लवकरच त्यातही अमूलाग्र बदल करण्यात येतील असेही शिंदे म्हणाले. जिल्ह्यातील तीन खासदारांना एकत्र करत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुन केंद्र-राज्य या माध्यमातून कोणकोणत्या योजना आणता येतील यावर विचार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
लोकल प्रवाशांच्या यातना असह्य :
डोंबिवलीहून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या सुमारे ६ लाख प्रवाशांना रोजचा प्रवास त्रासाचा झाला असून त्यांना विविध सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे. तर शहरांमधील रस्ता वाहतूक -कोंडीनेही नागरिकांना त्रस्त केले आहे. त्यामुळे शिळफाटा-पनवेल अथवा वाशीला जाणा-या प्रवाशांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.