डोंबिवलीत वाहतूक कोंडी
By Admin | Updated: April 1, 2015 00:05 IST2015-04-01T00:05:28+5:302015-04-01T00:05:28+5:30
रेतीने भरलेला वाळूचा ट्रक इंदिरा गांधी चौकातील वळणावर तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

डोंबिवलीत वाहतूक कोंडी
डोंबिवली : रेतीने भरलेला वाळूचा ट्रक इंदिरा गांधी चौकातील वळणावर तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. चालकाच्या स्टेअरींगसह बॉनेट आणि अन्य तपासण्यानंतरही बिघाड लक्षात आला नाही. त्यामुळे दुस-या एका ट्रकच्या सहाय्याने त्यास खेचून पुढे घेण्याचा निर्णय घेण्यात आला, आणि भरलेली रेती काढण्यासाठी बुलडोझर बोलावण्यात आला. बंद पडलेला ट्रक, बुलडोझर आणि रेती भरण्यासाठी आलेला ट्रक अशा अवाढव्य वाहनांमुळे इंदीरा गांधी चौकात सकाळच्या वेळेत वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले.
केडीएमटीच्या बस वाहतूकीलाही त्याचा फटका बसला, निवासी विभागासह कल्याण, दावडी व अन्य ठिकाणी जाणा-या गाड्यांना वळणावर पुरेशी जागाच न मिळाल्याने कोंडीत भर पडली. त्यातच रिक्षा चालक, चार चाकी वाहने, यांसह रिक्षा टेम्पो आदींमुळेही कोंडीत भर पडली. सकाळच्या वेळेत या ठिकाणाहून जाणा-या स्कूल बस सह अन्य खासगी कंपन्यांच्या गाड्यांनाही येथून मार्ग काढतांना त्रास झाला. मानपाड्याला जाणा-या वाहनांनाही त्याचा फटका बसला, आणि सकाळच्या पहिल्याच सत्रात वाहतूक नियंत्रणाचे तीनतेरा वाजले. ही घटना सकाळी घडल्याने याबाबतची माहिती वाहतूक विभागाला नव्हती, त्यामुळे येथे कोंडी होताच ती सोडविण्यासाठी स्थानिकांसह काही सतर्क वाहन चालकांनी एकत्र येत ती सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले. या विशेष दृश्याने मात्र काही वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.