डोंबिवलीत वाचक वाढतोय!
By Admin | Updated: December 19, 2014 23:09 IST2014-12-19T23:09:42+5:302014-12-19T23:09:42+5:30
इंटरनेटवर ई-बुकच्या जमान्यात हवे ते क्षणार्धात मिळवण्यात येते, मात्र तरीही पुस्तक वाचण्याची सवय असलेल्या वाचकांना हवे ते देण्यासाठी ठाणे-कल्याण-डोंबिवलीसारख्या

डोंबिवलीत वाचक वाढतोय!
अनिकेत घमंडी, डोंबिवली
इंटरनेटवर ई-बुकच्या जमान्यात हवे ते क्षणार्धात मिळवण्यात येते, मात्र तरीही पुस्तक वाचण्याची सवय असलेल्या वाचकांना हवे ते देण्यासाठी ठाणे-कल्याण-डोंबिवलीसारख्या महानगरांमध्ये अनेक ठिकाणी ग्रंथालये कार्यरत असतात. अशाच पद्धतीने गेली २५हून अधिक वर्षे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या वाचनालयाचीही धडपड सुरु आहे. यातूनच यावर्षीही सुमारे ४५० नव्याने सभासद झाल्याने या ठिकाणी डोंबिवलीकर वाचकांचा टक्का वाढल्याचे निदर्शनास येत आहे.
शहरात महापालिकेसह अन्य महत्वाच्या ठिकाणी तब्बल सात-आठ खासगी वाचनालये आहेत. ती सर्वच्या सर्व अत्यंत सुस्थितीत सुरू असून त्या ठिकाणी वाचकवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. गतवर्षी प्रौढ विभागात सुमारे १५०० सभासद होते, त्यात २०० ची भर पडून आजमितीस तेथे १७०० सभासद आहेत. वाचकांसाठी पन्नास हजार पुस्तके उपलब्ध असून तब्बल १२ तास चालणारे डोंबिवलीतील एकमेव वाचनालय आहे. दोन पाळयांमध्ये ते सुरू असून सकाळी आठ ते रात्री आठ अशी त्याच्या वेळा आहेत. दुसरा व चौथा शनिवार, सार्वजनिक सुट्या वगळता आठवड्याचे सातही दिवस ते सुरू असते. येथे दररोज बहुतांशी सर्वभाषिक येत असून त्यासाठी रोज नित्यनियमाने पाचशे ते सातशे वाचक या ठिकाणी येतात. त्यांच्यासाठीही वेगळी व्यवस्था आहे.
महापालिका जरी ‘क’ वर्गात मोडत असली तरीही वाचनालय मात्र ‘अ’ वर्गात मोडत असल्याने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य डोंबिवलीकरांसाठी उपयुक्त अशी लायब्ररी आहे. दरवर्षी या ग्रंथसंग्रहालयाला सुमारे १ लाख ९२ हजारांचे अनुदान मिळते. विविध विषयांमध्ये डॉक्टरेट मिळवणारे व पोस्ट ग्रॅज्युएट विषय हाताळणारे अनेक विद्यार्थी येथील संदर्भ ग्रंथालयाचा आधार घेतात. राज्यातील अनेक ठिकाणी या ग्रंथसंग्रहालयाचा नावलौकीक आहे. मासिक विभागही वेगळा असून त्याचे ८९१ सभासद आहेत.
निरनिराळया विषयांवरील मासिके या ठिकाणी वाचावयास मिळतात. बालविभागही या ठिकाणी असून त्यातही १८० विद्यार्थी सहभागी आहेत. इंग्रजीसह हिंदीची सुमारे २१०० पुस्तके असून संस्कृत पुस्तकांचा मात्र या ठिकाणी अभाव आहे. ग्रंथालयाचा डोलारा सांभाळण्यासाठी दोन अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्याचे योगदान मोलाचे आहे.