डोंबिवली मनसेच्या ‘जत्रे’तून ‘आनंदवन’ला ७ लाख
By Admin | Updated: May 6, 2015 23:36 IST2015-05-06T23:36:26+5:302015-05-06T23:36:26+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या जत्रेतून मिळालेला ७ लाखांचा निधी ‘आनंदवन’ला देण्यात आला.

डोंबिवली मनसेच्या ‘जत्रे’तून ‘आनंदवन’ला ७ लाख
डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या जत्रेतून मिळालेला ७ लाखांचा निधी ‘आनंदवन’ला देण्यात आला. जत्रेतील स्टॉलधारकांनी दिलेली सव्वा लाखाची देणगी, एका देणगीदाराने दिलेले दोन लाख रुपये, पेंटिंग आॅक्शनमधून जमा झालेला पावणेतीन लाखांचा निधी आणि कलाकारांच्या पेंटिंग विक्रीतून जमा झालेले २ लाख ८० हजार रुपये असा सर्व निधी आनंदवनला देण्यात आला. तसेच ‘जत्रे’तील दानपेटीमध्ये जमा झालेले सुमारे एक लाख रुपये देखील आनंदवनला देण्यात आले आहेत. १ ते ३ मे दरम्यान डोंबिवलीत आयोजित केलेल्या या जत्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलावंतांना एकाच मंचाखाली आणण्याच्या उद्देशाने मनसे डोंबिवली शाखेच्या वतीने या जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.
१०० हून अधिक कलाकारांच्या ५०० पेक्षा जास्त कलाकृती येथे मांडल्याचे समन्वयक संदीप वेंगुर्लेकर यांनी सांगितले. ही रक्कम बाबा आमटे यांचे नातू कौस्तुभ आमटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या जनहित कक्षाचे प्रमुख संदेश प्रभुदेसाई यांनी दिली.
स्ट्रीट आर्टचा अभिनव प्रयोग आणि मोठ्या आकाराचे डिजिटल पेंटिंग हे या महोत्सवाचे आकर्षण ठरले. या ठिकाणी मांडलेल्या वस्तूविक्रीच्या रकमेतील १० टक्के रक्कमही आनंदवनला देण्यात आली. काही कलावंतांनी आपली मानधनाची रक्कमही दिल्याचे त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)