Join us  

डॉलर बनले कागदाचे बंडल आणि साबणाची वडी! दोन लाखांचा चुना लावणाऱ्यावर गुन्हा दाखल

By गौरी टेंबकर | Published: March 26, 2024 4:09 PM

तक्रारदार माताप्रसाद राजभर (३२) हे विरार मध्ये मोबाईल दुरुस्तीचे दुकान चालवितात. त्यांना १४ मार्चला नसीम नावाच्या व्यक्तीने फोन करत माझ्याकडे बाहेरील देशाच्या २० रुपयांच्या नोटा आहेत, त्या एक्सचेंज करायचा आहेत, असे सांगितले.

मुंबई: दोन लाख रुपये घेत त्या बदल्यात अमेरिकन डॉलर देण्याचे सांगत फसवणूक करण्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात घडला. याप्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर वाकोला पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

तक्रारदार माताप्रसाद राजभर (३२) हे विरार मध्ये मोबाईल दुरुस्तीचे दुकान चालवितात. त्यांना १४ मार्चला नसीम नावाच्या व्यक्तीने फोन करत माझ्याकडे बाहेरील देशाच्या २० रुपयांच्या नोटा आहेत, त्या एक्सचेंज करायचा आहेत, असे सांगितले. त्यावर किती नोटा आहेत अशी विचारणा राजभर यांनी केल्यावर त्याने त्याच्याकडे १ हजार ७५३ नोटा असल्याचे सांगितले ज्या राजभरनी त्याला घरी घेऊन यायला सांगितले.

त्यानंतर १७ मार्च रोजी नसीमने राजभर यांची भेट घेत २० रुपयाची नोट त्यांना दाखवत ती त्यांच्याकडे ठेवली. तसेच अशाच सर्व नोटा आहेत असेही तो म्हणाला. त्याने २२ मार्चला राजभर यांना फोन करत माझी आंटी सायनवरून सांताक्रुजला येणार आहे तेव्हा तू सांताक्रुजला ये आणि तिच्याकडून बाहेरच्या देशाच्या वीस रुपयाच्या नोटा घे असे तो म्हणाला.त्यावर मी एवढ्या लांब येणार नाही तेव्हा तूच माझ्या घरी ये असे राजभरनी स्पष्ट केले. मात्र नसीमच्या सतत फोन करण्यामुळे तक्रारदार पत्नीला घेऊन २४ मार्च रोजी सांताक्रुज स्टेशनला आले. तिथे नसिमने वसीम तसेच अन्य एका व्यक्तींसोबत मिळून पैसे आणल्याचे भासवले. मात्र तक्रारदाराने पैसे न आणल्याने २५ मार्चला पुन्हा भेटण्याचे ठरले. ही भेट सांताक्रुज पूर्वच्या प्रभात कॉलनी रोड परिसरात झाली. वसीमने तक्रारदाराला पांढऱ्या रंगाची पिशवी देत त्यात बाहेरील देशाच्या १ हजार ७५३ नोटा असल्याचे सांगत त्यांच्याकडून २ लाख रुपये घेतले. ते निघून गेल्यावर तक्रारदाराने पत्नीसह सांताक्रुज बस डेपोमध्ये ती पिशवी उघडून पाहिली. तेव्हा त्यात नीव्वळ दोन अमेरिकन चलनाच्या नोटा, कागदाचे बंडल आणि साबणाची वडी होती. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राजभर यांनी वाकोला पोलिसात धाव घेतली.

टॅग्स :धोकेबाजीगुन्हेगारीपोलिस