Join us

कोणी भाड्याने घर देता का घर ? नायगाव बीडीडी चाळवासीयांपुढे पेच : पुनर्वसनासाठी महिनाभरात जुने घर सोडण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 11:44 IST

मात्र, दादर पूर्व  आणि परिसरातील घरांचे भाडे गगनाला भिडले असून, प्रती महिना २५ हजार रुपयांत घर भाड्याने मिळत नसल्याने चाळवासीय हवालदिल झाले आहेत.

सुजित महामुलकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दादर पूर्वेकडील नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी म्हाडाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील महिना-दीड महिन्यात किमान १० इमारतींमधील ८०० कुटुंबांना घरे रिकामी करावी लागणार आहेत. मात्र, दादर पूर्व  आणि परिसरातील घरांचे भाडे गगनाला भिडले असून, प्रती महिना २५ हजार रुपयांत घर भाड्याने मिळत नसल्याने चाळवासीय हवालदिल झाले आहेत.

म्हाडाने नुकतीच रहिवाशांची बैठक घेतली. यावेळी १० इमारतींमधील रहिवाशांनी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत घरे रिकामी करून दिल्यास लवकर काम सुरू करणे सोपे होईल, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे रहिवाशांनी भाड्याने घर शोधण्यास सुरुवात केली. अनेकांना किमान भाडे ३० ते ४० हजार रुपये महिना असल्याचे सांगण्यात आले.

भाडे वाढवून दिल्यास आम्ही घर रिकामे करू

म्हाडाने बीडीडी प्रकल्पधारक कुटुंबांना तीन वर्षांपूर्वी महिना २५ हजार रुपये भाडे देण्याचे निश्चित केले आहे. आता घरे रिकामी करणाऱ्यांना २०२८ मध्ये नव्या घराचा ताबा मिळणार आहे.

त्यामुळे २५ हजारांत आताच घरे मिळत नसताना पुढील तीन वर्षांचा विचार करता भाडे वाढवून दिले तरच आम्ही घरे रिकामी करू, असे रहिवासी अमोल साळुंखे यांनी सांगितले.

वडाळा येथील सहकार नगरमध्ये कॉमन टॉयलेट असूनही २०-२२ हजार रुपये भाडे होते. ते आता ३०-३५ हजार झाले, असे साळुंखे यांनी सांगितले.

नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांनी आताच घरे रिकामी केल्यास त्यांना २०२८ मध्ये नव्या घराचा ताबा मिळणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी घरांसाठी शोधाशोध सुरू केली आहे. पण २५ हजार रुपये भाड्यात घर मिळत नाही.

उपनगरांमध्येही निराशा

दादर पूर्व आणि लगतच्या करी रोड, लोअर परळ, काळाचौकी, माटुंगा, माहीम, सायन परिसरातील घरभाडे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने काहींनी उपनगरांतही जाऊन चौकशी केली.

मात्र, तिकडेही निराशाच पदरी पडली. एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी पुनर्वसन प्रकल्प सुरू झाल्याने भाड्याच्या घरांची मागणी वाढली आहे.त्यामुळे २२५-२५० चौरस फुटांचे घरही घेणे सध्या परवडत नाही, असे रहिवासी संतोष घोसाळकर यांनी सांगितले.

अनेकांच्या घरात शाळकरी मुले, वयोवृद्ध आहेत, त्यांना परिसर सोडून दूरवर भाड्याने घर घेणे वास्तविकदृष्ट्या शक्य नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :मुंबई