Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्‍यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 23:07 IST

मागण्या मान्य न झाल्‍यास २२ पासून बेमुदत काम बंद

ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविदयालय आणि रुग्‍णालयातील वैदयकीय अधिकारी हे महत्‍वाचे पद असते. हे डॉक्‍टर्स कोरोना काळात एकही दिवसाची सुट्टी न घेता किंवा क्‍वारंटाईन लीव्हही न घेता सलग चोवीस तास काम करत आहेत

मुंबई - राज्‍य शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्‍णालयातील वैदयकिय अधिकाऱ्यांनी आपल्‍या मागण्यांसाठी ७ एप्रिलपासून काळया फिती लावून काम सुरू केले आहे. शासनाने तातडीने मागण्या मान्य न केल्‍यास राज्‍यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविदयालयांत १५ एप्रिल रोजी चोवीस तास काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्‍याउपरही शासन मागण्या मान्य करणार नसेल तर नाईलाजास्‍तव २२ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा वैद्यकीय महाविदयालय वैद्यकीय अधिकारी संघटना महाराष्‍ट्रने दिला आहे. हे कामबंद आंदोलन करताना आम्‍हाला कुठल्‍याही रूग्‍णाला किंवा प्रशासनाला वेठीला धरायचे नसून आमच्या मागण्यांची सातत्‍याने होणारी हेळसांड पाहूनच हे पाऊल अतिशय नैराश्यातून आम्‍हाला उचलावे लागत असल्‍याचे संघटनेचे म्‍हणणे आहे.

शासकीय वैद्यकीय महाविदयालय आणि रुग्‍णालयातील वैदयकीय अधिकारी हे महत्‍वाचे पद असते. हे डॉक्‍टर्स कोरोना काळात एकही दिवसाची सुट्टी न घेता किंवा क्‍वारंटाईन लीव्हही न घेता सलग चोवीस तास काम करत आहेत. शासकीय रूग्‍णालयातील सर्वच महत्‍वाच्या जबाबदाऱ्या या डॉक्‍टर्संना पार पाडाव्या लागत आहेत. त्‍यातून अनेकांना कोरोनाची लागणही झाली. मात्र, उपचार घेऊन असे डॉक्‍टर्स तात्‍काळ रूजूही झाले आहेत. गर्व्हमेंट मेडीकल कॉलेजमधील वैदयकिय अधिकाऱ्यांना कायमस्‍वरूपी करण्यात यावे व त्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या त्‍यांच्या मागण्या आहेत. तसेच हे पद मंजूर व कायमस्‍वरूपीच असल्‍याने या निर्णयाचा शासनावर कोणताही आर्थिक भारही पडणार नाही असे संघटनेचे म्‍हणणे आहे. 

दरम्यान, यापूर्वी ऑक्‍टोबर २०२० मध्येही संघटनेने आंदोलन पुकारले होते, तेव्हा शासनाकडून ज्‍यांची दोन वर्षे सेवा झाली आहे. त्‍यांना कायमस्‍वरूपी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्‍याबाबत पुढे कोणताही निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉक्‍टरांनी ७ एप्रिलपासून काळया फिती लावून काम सुरू केले आहे.१५ एप्रिल रोजी चोवीस तासांसाठी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.याउपरही मागण्या मान्य न झाल्‍यास २२ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.१५ एप्रिल रोजी मुंबईतील जे.जे.रूग्‍णालय येथे संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे.राज्‍यभरातील शासकीय रूग्‍णालयातही हे आंदोलन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याडॉक्टरवैद्यकीय