Join us

डॉक्टरांच्या निवडणुकीला स्थगिती; सावळ्या गोंधळावरून नाराजी, वैद्यकीय शिक्षण विभागाने पत्रक काढून दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:21 IST

Doctors' Election: महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या (एमएमसी) निवडणुकीसाठी गुरुवारी मतदानास सुरुवात झाली. मात्र, दुपारी दोननंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिल्याने वैद्यकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली. शासनाच्या या सावळ्या गोंधळावर डॉक्टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

मुंबई -  महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या (एमएमसी) निवडणुकीसाठी गुरुवारी मतदानास सुरुवात झाली. मात्र, दुपारी दोननंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिल्याने वैद्यकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली. शासनाच्या या सावळ्या गोंधळावर डॉक्टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

निवडणुकीच्या आदल्या दिवशी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने पात्र निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश देत निवडणूक प्रक्रिया स्थगित केली होती. त्यावर राज्य सरकारने तातडीने निवडणूक अधिकारी शिल्पा परब यांच्या जागी अवर सचिव सुनील धोंडे यांची नियुक्ती केली. त्यामुळे गुरुवारी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत विविध शासकीय रुग्णालयांत मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. दुपारपर्यंत मतदान सुरू होते. त्यानंतर नाट्यमय पद्धतीने घडामोडी होऊन वैद्यकीय शिक्षण विभागाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नावाने पत्र काढून निवणूक प्रक्रिया तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थगिती देत असल्याचा दाखला देण्यात आला होता. 

नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यापुढे आपण काय मत व्यक्त करणार, येत्या काळात ज्या सूचना देण्यात येतील. त्या पद्धतीला सामोरे जाऊ.  ग्रामीण भागातील काही डॉक्टरांनी मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी १५० किलोमीटरच प्रवास करून मतदान करण्यासाठी उपस्थिती लावली होती. जे डॉक्टर निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांनी सकाळपासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली होती. मुंबईसाठी जे. जे. रुग्णालयात मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. त्या ठिकाणी दुपारपर्यंत ३५० पेक्षा अधिक मतदारांनी येऊन मतदान केले होते. मुंबईतील डॉक्टरांनी सकाळीच येऊन मतदान केले होते.

पत्रात काय?मतदान प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश  सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याचे सरकारी वकील आदित्य पांडे यांनी दूरध्वनीवरून कळविले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेता, मतदान प्रक्रिया थांबविण्याचे व लिफाफे व मतपेट्या नियमांनुसार कार्यपद्धतीने सीलबंद करून जिल्हा कोषागारात ठेवण्याचे निर्देश आहेत.

टॅग्स :डॉक्टरनिवडणूक 2024