Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर महिलेच्या मृत्यूनंतर १७.५० कोटींवर डल्ला; मानसिक रुग्ण मुलाला पाठवले रिहॅबमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 17:48 IST

मानसिकदृष्ट्या असाहाय्य मुलाच्या उपचारांसाठी ठेवलेल्या मालमत्तेवरच डल्ला मारल्याप्रकरणी खार पोलिसांनी आंचल माधवदास भांबानी, तिचा नातेवाईक महेंद्र देवकीनंदन चोहितरमानी यांच्यावर मंगळवारी गुन्हा नोंदविला आहे.

मुंबई : खार पश्चिममधील एका उच्चभ्रू घरात ज्येष्ठ डॉक्टर महिलेचा मृतदेह दिवस-दिवस कुजत पडलेला... आणि त्याच घरात तिचा स्किझोफ्रेनियाग्रस्त मुलगा अनभिज्ञ अवस्थेत राहत होता. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेला १७.५० कोटींच्या गैरव्यवहाराची किनार लाभली आहे. मानसिकदृष्ट्या असाहाय्य मुलाच्या उपचारांसाठी ठेवलेल्या मालमत्तेवरच डल्ला मारल्याप्रकरणी खार पोलिसांनी आंचल माधवदास भांबानी, तिचा नातेवाईक महेंद्र देवकीनंदन चोहितरमानी यांच्यावर मंगळवारी गुन्हा नोंदविला आहे.

तक्रारदार दीपा भाटिया या नवी दिल्ली येथे राहतात. त्यांच्या मावशी डॉ. वीणा गुरुमुख अडवाणी (८९) या सुत्रिम अपार्टमेंटमध्ये मुलगा अनिल अडवाणी (६०) याच्यासोबत राहत होत्या. अनिल गेली ३० वर्षे स्किझोफ्रेनियाने त्रस्त असून, मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचे तक्रारीत नमूद आहे. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याने खार पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी डॉ. अडवाणी यांचा मृतदेह घरात आढळला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे अनिल त्याच घरात राहत होता आणि आईच्या मृत्यूची त्याला जाणीवही नव्हती. आईच्या मृत्यूनंतर अनिलला कर्जतमधील 'कालिंडा रिहॅब' मध्ये दाखल करण्यात आले. ही अवस्था पाहून पोलिस आणि स्थानिकही सुन्न झाले होते.

स्वतःच्या खात्यात पैसे जमा

भाटिया मुंबईत आल्यानंतर त्यांनी अनिलची भेट घेतली. मात्र, तो कोणालाही ओळखत नव्हता. संशय आल्याने त्यांनी डॉ. वीणा आणि अनिल यांच्या बँक खात्यांची माहिती तपासली तेव्हा नामांकित बँकांमधील मोठ्या ठेवींची माहिती समोर आली. मात्र, व्यवहार तपासताना डॉ. अडवाणी यांच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन महिन्यांत तब्बल १७.५० कोटी रुपये आरोपींनी स्वतःच्या खात्यात वळते केल्याचा आरोप करण्यात आला.

मृत्यूची माहिती लपवली

आंचल हिने १४ नोव्हेंबर २०२५ रोजी मृत्यू दाखला प्राप्त केला होता. मात्र, तो संबंधित बँकांना जाणीवपूर्वक सादर केला नाही. त्यामुळे खातेदाराच्या मृत्यूची माहिती लपवून कोट्यवर्धीचे व्यवहार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor's death: Crores embezzled, mentally ill son sent to rehab.

Web Summary : Following a doctor's death in Mumbai, ₹17.5 crore was embezzled from her accounts. Her schizophrenic son, unaware of her death, was moved to a rehab facility. Police have registered a case against two relatives for misappropriating funds.