कचऱ्याची दुर्गंधी नको रे बाबा!
By Admin | Updated: July 15, 2015 23:04 IST2015-07-15T23:04:46+5:302015-07-15T23:04:46+5:30
शिक्षण देणे हे पवित्र काम समजले जाते. परंतु, ते करीत असताना आजूबाजूचे वातावरण ही तितकेच प्रसन्न असणे आवश्यक आहे. मात्र कल्याण डोंबिवलीतील महापालिकेच्या बहुतांश

कचऱ्याची दुर्गंधी नको रे बाबा!
- प्रशांत माने, कल्याण
शिक्षण देणे हे पवित्र काम समजले जाते. परंतु, ते करीत असताना आजूबाजूचे वातावरण ही तितकेच प्रसन्न असणे आवश्यक आहे. मात्र कल्याण डोंबिवलीतील महापालिकेच्या बहुतांश शाळांच्या बाहेर चक्क कचराकुंड्या ठेवल्या आहेत. त्यांच्या दुर्गंधीमध्येच येथील विद्यार्थ्यांना दुर्दैवाने शिक्षण घ्यावे लागत असल्याचे वास्तव डोंबिवली आयरे परिसरातील लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात पहावयास मिळते.
शाळेची इमारत दुमजली आहे. परंतु, तिच्या बाहेरच कचराकुंडी ठेवली आहे. त्यामुळे शाळेत जरी स्वच्छतेचे पाठ विद्यार्थ्यांना शिकविले जात असले तरी येता-जाता त्यांना दुर्गंधीला तोेंड द्यावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे आरोग्यही एकप्रकारे धोक्यात येण्याची शक्यता पाहता कचऱ्याची दुर्गंधी नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ त्यांच्यासह शिक्षकांवर येऊन ठेपली आहे. शाळेत सद्यस्थितीला इयत्ता १ली ते ७ वी चे २५७ विद्यार्थी आहेत. पटसंख्या समाधानकारक असली तरी त्याठिकाणीही सुविधांची बोंब असल्याचे आहे.
सफाई कर्मचारी नसल्याने स्वच्छतेची जबाबदारी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना पार पाडावी लागते. दोन वर्षापुर्वी शाळेला ५ संगणक मंजूर करण्यात आले होते. परंतु, यातील दोनच उपलब्ध झाले पण आजच्याघडीला ते ही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी संगणकीय ज्ञानापासून वंचित आहेत. येथील विद्यार्थ्यांनाही पाठयपुस्तकांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही शैक्षणिक सुविधा पुरविलेल्या नाहीत. मुलांना स्वच्छतेचे धडे मिळावे याकरीता प्रत्येक वर्गाला स्वच्छतेचे वार ठरवून दिले आहेत.
हा महापालिकेच्या प्रत्येक शाळेतील एक संस्काराचा भाग आहे. या माध्यमातून विद्यार्थी स्वच्छतेचे पाठ गिरवित असले तरी शाळेच्या बाहेर कचराकुंडीतून ओसंडून वाहणाऱ्या कचऱ्यातून ते काय बोध घेणार? असा सवाल उपस्थित होत आहे. ही कचराकुंडी तेथून हटवावी यासाठी काही शाळाप्रेमींनी प्रयत्नही केले. परंतु, त्यात यश आले नाही. प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेही याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे.