Join us  

'शिवसेनेलाही मतदान करू नका', अखेर मुंबईच्या सभेत 'राज'गर्जना झालीच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 9:18 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भाषणातून शिवसेनेचं नाव घेऊन टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दोन माणसं या देशासमोरील सर्वात मोठ संकट आहेत. त्यामुळे या दोन माणसांना निवडणूक देऊ नका, भाजपाला निवडून देऊ नका असे आवाहन राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या सभेत केले. मात्र, गेल्या 6 सभांमध्ये कुठेही उल्लेख न केलेल्या शिवसेनेचा उल्लेख करत शिवसेनेलाही मतदान न करण्याचं आवाहन राज यांनी प्रथमच केलं. त्यामुळे मुंबईतून शिवसेनेलाही टार्गेट करण्याला सुरुवात झालीच, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या शहीद भगतसिंग मैदानात राज ठाकरे यांनी आज सभा घेतली. काळाचौकी येथील सभेतही राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले. या सभेत प्रथमच राज ठाकरेंनी शिवसेनेचं नाव घेत शिवसेनला मतदान न करण्याचे आवाहन केलंय. राज यांची सभा झालेला काळा चौक परिसर हा विधानसभेसाठी शिवडी आणि लोकसभेसाठी दक्षिण मुंबई मतदारसंघात येतो. या मतदारसंघातून शिवसेनेच अरविंद सावंत उमेदवार आहेत, तर काँग्रेसकडून मिलिंद देवरा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, पहिल्यांदाच शिवसेनेचं नाव घेऊन राज यांनी सेनेला मतदान म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहांना मतदान, असे म्हटले आहे. 

नरेंद्र मोदी आणि अमित शहांना मला सांगायचंय, आज तुम्ही ईडी अन् सीबीआयच्या धमक्या देताय, धाडी घालताय. पण, उद्या तुम्हीही विरोधी पक्षात जाणारंय. त्यामुळे उद्या जेव्हा तुमच्यावरही धाडी पडतील ना, तेव्हा समजेल की नोटाबंदी हा या देशातील सर्वात मोठा स्कॅम असेल, असे म्हणत राज यांनी भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. तसेच, मोदींची सत्ता न येण्यासाठी भाजपाला मतदान करु नका आणि त्यामुळेच भाजपाच्य सोबत असलेल्या शिवसेनेला मतदान का करु नका, कारणं त्यांना मत देणं म्हणजे या दोघांना मत देण आहे, असे म्हणत राज यांनी मुंबईतील पहिल्याच सभेत शिवसेनेवर वार केला.  

दरम्यान, काही लोक या लोकसभा निवडणुकीत सभा घेऊन युतीला मत देऊ नका, असे आवाहन करत फिरत आहेत. युतीला मत द्यायचे नाही तर मग कोणाला मत द्यायचे, ते तरी सांगा, असे विचारल्यावर त्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. जे लोक आपला पक्ष चालवू शकले नाही, त्यांच्या पक्षाची दिशा हरपली आणि दुर्दशा झाली, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.

टॅग्स :भाजपाशिवसेनालोकसभा निवडणूक २०१९राज ठाकरेमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019