मैदानावरून मेट्रो नेऊ नका
By Admin | Updated: September 10, 2015 04:01 IST2015-09-10T04:01:17+5:302015-09-10T04:01:17+5:30
आझाद मैदान आणि ओव्हल मैदानावरून मेट्रो घेऊन जाऊ नका. या मैदानामुळेच हजारो खेळाडू तयार झाले असून आजही तयार होत आहे. मुंबईत जेमतेम मैदाने सुस्थितीत आहेत.

मैदानावरून मेट्रो नेऊ नका
मुंबई : आझाद मैदान आणि ओव्हल मैदानावरून मेट्रो घेऊन जाऊ नका. या मैदानामुळेच हजारो खेळाडू तयार झाले असून आजही तयार होत आहे. मुंबईत जेमतेम मैदाने सुस्थितीत आहेत. त्यामुळे मैदान वाचवण्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे, असे स्पष्ट मत भारताचे माजी कर्णधार व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ छायाचित्रकार मोहन बने यांच्या चॅम्पियन या सचित्र पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्ती प्रकाशन सोहळ्यात वेंगसरकर बोलत होते.
मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील उपस्थित होते. या वेळी तावडे म्हणाले की, युवा खेळाडूंना विशेष म्हणजे शालेय मुलांनी मैदानात जाणे गरजेचे आहे. चांगले खेळाडू तयार होण्यासाठी चांगल्या प्रशिक्षकाचीदेखील आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल आहे, पण त्या संकुलाची देखरेख योग्य प्रकारे होत नसल्याने क्रीडा संकुल हे दारुडे, गर्दुल्ले यांचे अड्डे बनले आहे.
आठवी, नववी आणि दहावीतील मुले जे क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करतील त्यांना क्रेडिट पद्धतीने १० गुण देण्याचा विचार सरकार करत आहे. राज्याच्या क्रीडा धोरणाकडे सरकारचे बारीक लक्ष असल्याची स्पष्टोक्तीही तावडे यांनी या वेळी केली. दरम्यान, या सोहळ्याला माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे, मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुजुमदार, गौतम ठाकूर यांचीदेखील विशेष उपस्थिती होती. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबइतील मैदाने सुरक्षित करण्याची गरज असून त्यासाठी आम्ही मैदानात उतरणार. शहरी मुलांनी मैदानी खेळ खेळण्यावर भर दिला पाहिजे. आपली माती आपली माणसे या उक्तीप्रमाणे हल्ली आपली माणसे खूप झाली, मात्र माती लोप पावत आहे. मैदाने वाचवणे हे एकट्या सरकारचे काम नाही, त्यासाठी सर्वांनी मदत करणे गरजेचे आहे.
- उद्धव ठाकरे,
शिवसेना पक्षप्रमुख