विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी झटकू नका

By Admin | Updated: January 18, 2015 01:42 IST2015-01-18T01:42:34+5:302015-01-18T01:42:34+5:30

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांसोबतच शाळांचीही आहे.

Do not shield the responsibility of students' safety | विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी झटकू नका

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी झटकू नका

लोकमत मेगा स्टिंग आॅपरेशनची दखल : शिक्षणमंत्री विनोद तावडेंची शाळांना सूचना
मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांसोबतच शाळांचीही आहे. शाळांनी ती झटकू नये. पोलिसांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी, त्यातून अंग काढून घेऊ नये, अशी सूचना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून शहरातील सर्वच शाळांना केली.
पेशावर हल्ल्यानंतर ‘लोकमत’ने मुंबईतल्या शाळा किती सतर्क आहेत, शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाय योजले आहेत, हे जाणून घेण्यासाठी मेगा स्टिंग आॅपरेशन केले. मात्र या मेगा स्टिंगमधून शाळा अजूनही गाढ झोपेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. विद्यार्थ्यांची सुरक्षा या मुद्द्याकडे शाळांनी केलेले दुर्लक्ष ‘लोकमत’ने या मेगा स्टिंगमधून मांडले. त्याबद्दल तावडेंनी ‘लोकमत’चे कौतुक केले. ‘लोकमत’च्या या मेगा स्टिंगने सर्वांनाच विचार करायला भाग पाडले, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
तावडे म्हणाले, की ‘लोकमत’चे मेगा स्टिंग आॅपरेशन वाचल्यानंतर लगेचच गृहमंत्री आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांनी, शिक्षक -पालक संघटनांनी काय उपाय योजायला हवेत, याची माहिती प्रत्येक शाळेला द्या़ प्रत्येक शाळेशी प्रत्यक्ष चर्चा करा, अशी सूचना पोलीस आयुक्तांना केल्याचे तावडेंनी सांगितले.
विद्यार्थ्यांची सुरक्षा हा गंभीर विषय असून त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असेही तावडेंनी स्पष्ट केले. शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पेशावर हल्ल्यानंतर राज्यात सुरक्षेचा आढवा घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल हाती येताच पुढील उपाययोजना करण्यात येतील. मात्र सध्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने नियोजन करण्यात येत आहे, असेही तावडे यांनी सांगितले. ( प्रतिनिधी)

Web Title: Do not shield the responsibility of students' safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.