‘मुझे मेरी अम्मी से दूर मत करो’
By Admin | Updated: July 13, 2015 02:45 IST2015-07-13T02:45:09+5:302015-07-13T02:45:09+5:30
तब्बल ११ वर्षांनंतर दोन मुलींची आई असलेली महिला त्या मुलींचा सध्या सांभाळ करीत असलेल्या महिलेकडे पोहोचते. पण जिने सांभाळ केला आहे, त्या आईला

‘मुझे मेरी अम्मी से दूर मत करो’
मनीषा म्हात्रे , मुंबई
तब्बल ११ वर्षांनंतर दोन मुलींची आई असलेली महिला त्या मुलींचा सध्या सांभाळ करीत असलेल्या महिलेकडे पोहोचते. पण जिने सांभाळ केला आहे, त्या आईला सोडण्यासाठी चिमुरड्या काहीही केल्या तयार होत नाहीत. ‘मुझे मेरी अम्मी से दूर मत करो’ अशी आर्त हाक या मुली देतात, तेव्हा अनेकांच्या डोळ््यांतून अश्रू आल्याशिवाय राहत नाही.
२००४ साली एका संध्याकाळी नागपाड्याच्या छोटा सोनापूर परिसरातील शुक्राजी कंपाउंडमध्ये असलेल्या एका कचराकुंडीत दोन जीव रडत होते. दोघीही मुली. एक सहा महिन्यांची तर दुसरी दीड वर्षाची. ही बातमी याच परिसरात राहणाऱ्या रुबिना रफिक शेख या महिलेपर्यंत पोहोचली. दोन कोवळ्या अनाथ जीवांना त्यांची निष्ठुर आई कचराकुंडीत फेकून गेली होती. दोन्ही मुलींना रडताना बघून या मातेचे हृदय हेलावले. रुबिनाने पुढाकार घेऊन दोन्ही चिमुकल्यांना घरी नेले. स्वत:च्या पोटच्या मुलींप्रमाणे आपलेसे केले. मोठीचे नाव कैसर तर छोटीचे कौसर ठेवण्यात आले.
मात्र २४ मार्च २०१५ रोजी सायंकाळी रुबिनासह या मुलींच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. सायंकाळी सात वाजता चांदणी अन्वर अली नावाची महिला पोलिसांसह रुबिनाच्या घरी धडकली. नेमके काय चालले आहे हे त्या चिमुकल्यांना समजत नव्हते. मुलींसह रुबिनाला नागपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत रुबिनाकडे चौकशी केल्यानंतर अचानक गुन्हेगारांप्रमाणे या चिमुकल्यांना डोंगरीच्या बाल सुधारगृहात पाठवण्यात आले. रुबिनाला कवटाळून उभ्या असलेल्या दोघी चिमुकल्या तिला सोडण्यास तयार नव्हत्या.
त्यानंतर रुबिनाने उच्च न्यायालयात धाव घेतली. ५४ दिवसांच्या विरहानंतर या मुलींचा ताबा तात्पुरत्या स्वरूपात रुबिनाकडे आला. आपल्यापासून दूर होणार, या भीतीने रुबिना धास्तावल्या आहेत. तब्बल २० दिवसांनंतर रुबिनाला घरी सोडण्यात आले. मात्र आता पुढे काय होणार, हे कुणालाही निश्चित माहिती नाही. यामध्ये चांदणी आणि दोन्ही मुलींची डीएनए चाचणीदेखील घेण्यात आली. त्याचा अहवाल यायचा आहे. त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे.
--------------------
मी कसे त्यांना सोडू ? -रुबिना शेख (सांभाळ करणारी)
देवाच्या कृपेने मला सर्व काही दिले. त्यात ११ वर्षांपूर्वी मला एका कचराकुंडीत या दोन मुली सापडल्या. त्यांना प्रेमाची, मायेची ऊब दिली. कळत-नकळत त्यांच्याशी घट्ट नाळ जोडली गेली. सर्वकाही ठीक असताना अचानक या मुली चांदणीमुळे माझ्यापासून दूर झाल्या. अडीच वर्षांपूर्वी या महिलेचा पती दारूच्या नशेत मुली घेण्यासाठी आला होता. तेव्हा पत्नीला घेऊन ये, मग मुली स्वाधीन करते, असेही आपण सांगितले होते. मात्र ती व्यक्ती पुन्हा परतलीच नाही. तब्बल ११ वर्षांनंतर मातृत्व जागी झालेली चांदणी मुलींचा हक्क मागत आहे. मात्र मी या मुलींना कसे सोडू?
------------
कायदा काय सांगतो...
एखादे बाळ आपल्याला सापडले तर त्याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याला कळवणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर पोलिसांमार्फत ते मूल बालकल्याण संस्थेकडे नेण्यात येते. त्यानंतर रीतसर बाळाला दत्तक घेता येते. अनेकदा अशा प्रकरणांत पालक समोर येत नाहीत. अशात रुबिना शेखच्या प्रकरणात पाहावयास गेले तर यावेळी फारच किचकट परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे कायद्याप्रमाणे रीतसर प्रक्रियेची अंमलबजावणी न केल्याने दोन्ही मुलींचा रीतसर हक्क मूळ आईकडे कायम आहे. मात्र रुबिनाने एवढी वर्षे त्यांचा सांभाळ केल्याने तिचाही त्यांच्यावरचा हक्क तेवढाच महत्त्वाचा आहे.
- किशोर भामरे,
प्रकल्प संचालक, प्रथम संस्था
---------------
(जन्म दिल्याचा दावा करणारी)
गावावरून लग्न करून आले तेव्हा मला मुंबईची काहीही माहिती नव्हती. त्यात पाच मुले सोबत होती. पतीला काम नाही. आम्ही सायन परिसरात भाड्याने राहत होतो. माझा पती ज्या व्यक्तीकडे काम करायचा, तो त्याच्या पूर्णपणे अधीन झाला होता. त्या व्यक्तीनेच मला माझ्या मुलींपासून वेगळे केले. बिकट परिस्थितीमुळे आम्ही रस्त्यावर आलो. त्यानेच माझ्या पतीपासून मला दूरकेले. अनेक रात्री फुटपाथवर तर अनेकदा नाल्याशेजारी मी मुलांसोबत रात्र काढली.
पतीची विचारणा करण्यासाठी या व्यक्तीकडे गेले असता त्यांनी मला मारहाण केली. त्यात माझी तब्येत पूर्णत: खालावली. त्याने माझ्या पाचही मुलांना त्यांच्याकडे ठेऊन दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. तेव्हा पतीसह मुलांना पाठवतो, असेही सांगितले. मात्र जेव्हा या व्यक्तीकडे मुलांच्या मागणीसाठी गेले, तेव्हा त्याने माझ्या दोन मुली रुबिनाकडे सांभाळायला दिल्या आणि तिघांना माझ्याकडे सोपवले. मी खूप विनंती केली, मात्र माझे कोणीही ऐकले नाही. मी अनेकदा दोन्ही मुलींना घेण्यासाठी गेले. मात्र तिने मला मुली दिल्या नाहीत. अखेर पोलीस ठाण्याचे दरवाजे मी ठोठावले.
----------------
पोलिसांचा बेजबाबदारपणा...
उच्च न्यायालयाने सध्या रुबिना यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात मुलींचा ताबा दिला आहे. या प्रकरणात चांदणी आणि दोन्हीही मुलींची डीएनए टेस्ट करण्यात आली आहे. त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. त्यानुसार न्यायालय पुढील निर्णय देईन. मात्र प्रकरणात पोलिसांनी अतिशय बेजबाबदारपणा दाखवलेला दिसून आला. कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता, त्यात सायंकाळी महिलांना ताब्यात घेणे कायद्यात बसत नसताना रुबिनासह या दोन मुलींची रात्री अडीच वाजेपर्यंत चौकशी केली. कुठल्याही प्रकारची माहिती न घेता मुलींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले. हा कुठला न्याय, यावरही कारवाई होणे गरजेचे आहे.
- अॅड. मतीम शेख,
रुबिना शेख यांचे वकील