Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, त्यांना न्याय द्या -  अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 20:34 IST

राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. गेल्या 7 दिवसात 34 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत, यावरून हे  सरकार शेतकरी आत्महत्यांबाबत गंभीर नाही, हे स्पष्ट झाले आहे.

मुंबई, दि. 17 - राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. गेल्या 7 दिवसात 34 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत, यावरून हे  सरकार शेतकरी आत्महत्यांबाबत गंभीर नाही, हे स्पष्ट झाले आहे. हवेवर आलेले आणि हवेत असलेले हे सरकार कधी हवेत विरून जाईल हे कळणारही नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, राज्य सरकार शेतक-यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत यावरून शेतक-यांचा या सरकारवर विश्वास नाही हे स्पष्ट झाले आहे. सरकार शेतक-यांना कर्जमाफी मिळावी म्हणून प्रयत्न करते आहे की, कर्जमाफीचा लाभ मिळू नये म्हणून जाचक अटी व शर्ती घालत आहे ? या सरकारचा कारभार पाहता हे सरकार शेतक-यांच्या जीवावर उठले आहे, असे दिसते असे अशोक चव्हाण म्हणाले.विरोधी पक्ष, सुकाणू समितींवर मुख्यमंत्र्यांकडून ज्या भाषेत टीका होते त्यातून सत्तेचा अहंकार दिसून येतो. त्यातही तीन महीने झाले तरी मुख्यमंत्र्यांना संघर्ष यात्रेवर टीका करावी लागते यातच सर्व काही आले. गेली अडीच वर्ष कर्जमाफी देणार नाही असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांना संघर्षयात्रेमुळेच कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. फडणवीसांच्या काळात इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना संप करावा लागला. संघर्ष यात्रेचे यश संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. भाजपाच्या शिवार संवाद यात्रेला किती लोक होते? आणि लोकांनी कसा प्रतिसाद दिला ते मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावे असेही यावेळी अशोक चव्हाण म्हणाले.

सुकाणू समितीला अपशब्द वापरल्याबद्दल जाहीर निषेध...महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आंदोलनाचे प्रतिनिधीत्व करणा-या सुकाणू समितीला जीवाणू समिती आणि आंदोलक शेतक-यांना देशद्रोही म्हटल्याबद्दल कॉंग्रेसने जाहीर निषेध व्यक्त केला आहे. 

अशा त-हेची भाषा शोभनीय नाही...भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी शेतक-यांना साले म्हटले आहे. भाजपच्या इतर नेत्यांनीही वेळोवेळी शेतक-यांची अवहेलना केली आहे. भाजप नेत्यांची ही वक्तव्ये भाजपची संस्कृती दर्शवतात परंतु मुख्यमंत्र्यांच्या पदाला अशा त-हेची भाषा शोभनीय नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.