रस्त्यावर उत्सव नकोच!
By Admin | Updated: July 18, 2015 05:05 IST2015-07-18T05:05:34+5:302015-07-18T05:05:34+5:30
यंदाच्या वर्षी तरी रस्त्यावर मंडप उभारण्यास परवानगी देण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करणारा महापालिकेचा अर्ज उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.

रस्त्यावर उत्सव नकोच!
मुंबई : यंदाच्या वर्षी तरी रस्त्यावर मंडप उभारण्यास परवानगी देण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करणारा महापालिकेचा अर्ज उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. तसेच मार्च महिन्यात दिलेल्या आदेशानुसार उत्सव मंडपांना परवानगी देण्याचे धोरण निश्चित करा, असेही न्यायालयाने पालिकेला सांगितले आहे. त्यामुळे पालिकेला चांगलीच चपराक बसली असून, आता निर्बंधांचे धोरण प्रशासनाला निश्चित करावे लागणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे उत्सवांना निर्बंध घालणारे न्यायालयाचे आदेश उशिरा मिळाले, त्यामुळे यंदा त्याची अंमलबजावणी करण्यास वेळ नाही. मात्र पुढील वर्षी
नक्की याची अंमलबजावणी केली जाईल आणि उत्सवांना परवानगी दिली नाही, तर भाविकांच्या भावना दुखावतील, हा पालिकेचा सर्व युक्तिवाद खोटा व चुकीचा आहे, असे न्यायालयाने फटकारले. रस्त्यावर मंडपांना परवानगी देऊ नका, असे आदेश असतानाही पालिकेने मूर्तींच्या कार्यशाळेसाठी २४ जूनपर्यंत मंडपांना परवानगी दिली. त्या आम्ही रद्द करणार नाही. पण त्यानंतर रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी आलेल्या अर्जांना परवानगी देऊ नका, असेही न्यायालयाने पालिकेला बजावले आहे.
मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले होते. आता ते काय भूमिका घेतात त्यावर आमचे लक्ष आहे.
- अॅड. नरेश दहिबांवकर,
बृहन्मुबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष
न्यायालयाने नागरिकांच्याही मागण्यांचा विचार करायला हवा. -बाळा नांदगावकर, मनसे नेते
न्यायालयाच्या आदेशांचा सन्मान करतच यंदा मुंबईत गणेशोत्सव दणक्यात साजरा होईलच. पण यासाठी मार्ग शोधावा लागेल. -माधव भंडारी, भाजपा प्रवक्ते
न्यायालयाच्या निर्णयावर येत्या सोमवारी अथवा मंगळवारी कॅबिनेटमध्ये आम्ही चर्चा करु. त्यानंतर या संदर्भातील धोरणनिश्चिती केली जाईल, असे राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.