मुंबई : सिद्धिविनायक मंदिरात १२ ऑगस्ट रोजी असलेल्या अंगारकी निमित्त श्री गणेशाच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या दिवशी पहाटे ३:१५ वाजता महापूजा होईल. त्यानंतर दिवसभर पूजासत्रे, श्रींचे दर्शन, भजने आणि आरती होणार आहे. रात्री ११:५० वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील. मात्र, मंदिरात कॅमेरा आणि लॅपटॉप घेऊन जाण्याची परवानगी नाही.
मंदिर गाभारा परिसरात वैद्यकीय पथक तैनात केले जाईल. तसेच दोन रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामध्ये एक कार्डियक रुग्णवाहिका समाविष्ट आहे. सुरक्षेच्या कारणास्तव फायर इंजिन आणि अग्निशामक वाहनही तैनात करण्यात येणार आहेत.
फायर एक्स्टिंगविशर, फायर बकेट आणि फायर मार्शलची व्यवस्था देखील आहे. वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी बेस्टचे अधिकारी व कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ सेवेमधील सिद्धिविनायक हे स्थानकही यापूर्वीच खुलं झाल्याने भाविकांना दर्शनासाठी मेट्रोनेही येता येणार आहे. तसेच भाविकांसाठी मोफत बससेवा देखील उपलब्ध आहे.