भिकाऱ्यांना भीक घालू नका... गुन्हेगारी वाढतेय...

By Admin | Updated: December 28, 2014 01:48 IST2014-12-28T01:48:28+5:302014-12-28T01:48:28+5:30

भिकाऱ्यांना भीक घालू नका़़़ गुन्हेगारी वाढतेय़़़ असे फलक तेथील रेल्वे स्थानकावर लावले आहेत़

Do not begging beggars ... increasing crime ... | भिकाऱ्यांना भीक घालू नका... गुन्हेगारी वाढतेय...

भिकाऱ्यांना भीक घालू नका... गुन्हेगारी वाढतेय...

मनीषा म्हात्रे - मुंबई
रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांसह भिकाऱ्यांचाही विळखा वाढत चालला असताना मुलुंड पोलिसांनी यावर तोडगा काढत थेट भिकाऱ्यांना भीक घालू नका़़़ गुन्हेगारी वाढतेय़़़ असे फलक तेथील रेल्वे स्थानकावर लावले आहेत़ हा उपक्रम येथे यशस्वी झाल्यास मुंबईतील इतर रेल्वे स्थानकांवरही याची अंमलबावणी केली जाणार असल्याचे समजते़
रेल्वे पादचारी पूल व रेल्वे स्थानके हे सध्या भिकाऱ्यांचे मोक्याचे ठिकाण बनले आहे़ लहान मुलांना अंमलीपदार्थ देऊन झोपवतात व प्रवाशांना खाणाखुणा करून पैसे देण्याचे भावनिक आवाहन करतात़ यासाठी अंधांचाही वापर केला जातो़ याने प्रवाशांना अनेकदा नाहक त्रास होतो़ मात्र याच भिकाऱ्यांच्याआड अतिरेकी त्यांचा हेतू साध्य करू शकतात़ याचा सुगावादेखील भिकाऱ्यांना अतिरेकी लागू देणार नाहीत़ पण हे प्रवाशांच्या जिवावर बेतू शकते़ तर सदैव रेल्वे स्थानकावर आढळणारे गर्दुल्लेही भीक मागण्याच्या बहाण्याने महिलांवर हल्ला करतात़ महिलांचे दागिने व पॉकीटदेखील हे गर्दुल्ले लांबवतात़ तर काही अपंगही महिला डब्यात भीक मागण्यासाठी घुसतात़ हेदेखील महिलांसाठी घातक आहे़ त्यामुळे यावर कायमच तोडगा काढण्यासाठी आम्ही मुलुंड रेल्वे स्थानकावर भीक न देण्याचे आवाहन करणारे फलक लावले असल्याचे मुलुंड रेल्वे स्थानक प्रबंधक एम़ डॅनियल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
तर कुर्ला जीआरपीने गेल्या वर्षभरात भिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारला आहे़ याबाबत अधिक माहिती देताना कुर्ला जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक विजय धोपावकर म्हणाले, भीक मागणे हा कायद्याने गुन्हा असून, गेल्या वर्षी १ जानेवारी ते ३० डिसेंबरपर्यंत ५४ भिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये तीन पट वाढ झाली असून, नोव्हेंबर अखेरपर्यंत १३९ भिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली़
त्यातही १ नोव्हेंबर २०१४पासून रेल्वे पोलीस आयुक्तांंच्या आदेशानुसार कारवाई केलेल्या भिकाऱ्यांच्या माहितीचा तपशील अहवाल तयार केला जातो आहे़ यामध्ये संबंधित भिकाऱ्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी यासह फोटो व इत्थंभूत माहिती नमूद केली जाते़ तसेच बेवारस मृतदेहांची ओळख पटवतानादेखील या तपशिलाचा फायदा होतो, असेही धोपावकर यांनी सांगितले़

रेल्वे स्थानकांना फेरीवालेमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सीएसटी, दादर, कुर्ला, ठाणे व कल्याण अशा गजबलेल्या ठिकाणांवरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यातील काही रेल्वे स्थानकांवर भिकारी आता वस्तू विकण्यासाठी बसत आहेत. भिकारी आणि फेरीवालेमुक्त स्थानके झाली तर याचा फायदा प्रवाशांंच्या सुरक्षेसाठी मोलाचा ठरेल, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी सांगितले.

Web Title: Do not begging beggars ... increasing crime ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.