Join us  

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रोज १० हजार चाचण्या करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 7:42 PM

भाजपा आमदाराची पालिका आयुक्तांकडे मागणी

मुंबई : मुंबईत गेल्या जुलै महिन्यात मुंबई महानगर पालिकेने 198321 कोरोना टेस्ट केल्या असून यामध्ये 30000 अँटीजेन टेस्टचा समावेश आहे.सरासरी रोज 6397 टेस्ट केल्या असून 30000 अँटीजेन टेस्ट वजा केल्यास रोज सरासरी 5000 टेस्ट केल्या आहेत. तर रोज कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा हा 58 इतका आहे.

 मुंबईची घनता लक्षात घेता आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रोज किमान 10000 टेस्ट तरी करा अशी आग्रही मागणी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार अमित साटम यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. यामुळे कोरोनाचे लवकर शोधण्यास मदत होईल आणि मृत्यूचे प्रमाण देखिल कमी होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.यापूर्वी देखिल कोरोना चाचण्यांची संख्या वाढवा अशी मागणी आपण आयुक्तांकडे केली होती,मात्र एक लोकप्रतिनिधी आमदार असलेल आपल्या पत्राची साधी पोचसुद्धा त्यांनी दिली नाही याबद्धल त्यांनी नापसंती व्यक्त केली.

गेल्या 30 एप्रिल रोजी मुंबईत 6457 कोरोनाचे रुग्ण होते तर 270 रुग्णांचा मृत्यू झाला होता,31 मे रोजी कोरोनाचे 39464 कोरोना रुग्ण होते,तर 1279 रुग्णांचा मृत्यू झाला होता,30 जून रोजी 77197 कोरोनाचे रुग्ण होते तर 4554 रुग्णांचा मृत्यू झाला तर 31 जुलै रोजी कोरोनाचे 114287 रुग्ण होते तर 6350 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रोज कोरोना रुग्णांचा आकडा हा वाढतच असून मृत्यूची संख्या देखिल वाढत आहे हे देशाची आर्थिक राजधनी असलेल्या मुंबईला भूषणावह नाही अशी टिका त्यांनी केली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईमुंबई महानगरपालिकालॉकडाऊन अनलॉक