दिवाळी आली, उटणे स्नानाची वेळ झाली...
By Admin | Updated: October 21, 2014 04:45 IST2014-10-21T04:45:22+5:302014-10-21T04:45:22+5:30
निवडणुकांचा काळ संपला, महाराष्ट्रातील खुर्चीचा प्रश्नही सुटेल... नेत्यांसह सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दिवाळीही सुरू झाली आहे

दिवाळी आली, उटणे स्नानाची वेळ झाली...
महेश चेमटे, मुंबई
निवडणुकांचा काळ संपला, महाराष्ट्रातील खुर्चीचा प्रश्नही सुटेल... नेत्यांसह सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दिवाळीही सुरू झाली आहे. पारंपरिक फराळासोबत नवीन खाद्यपदार्थ बनवले आणि खरेदी केले जात आहेत. दिवाळीची आणखी एक खास ओळख म्हणजे अभ्यंगस्नान अर्थात उटणे स्नान.
प्राचीन काळापासून आपल्याकडे उटणे वापरण्याची प्रथा आहे. साधारणपणे दिवाळीनंतर थंडीला सुरुवात होते. थंडीचा सामना करण्यासाठी आणि त्वचेला बळक टी देण्यासाठी उटणे फायदेशीर ठरते. त्वचा नितळ, निकोप राखण्यासाठी उटणे महत्त्वाची भूमिका पार पाडते. उटणं लावण्याच्या देखील विविध पद्धती आहेत. काही जण गुलाब पाण्यात तर काही जण तेलात मिसळून उटणे स्नान करतात. साध्या पाण्यात मिसळून देखील उटणं वापरता येते.
उटण्याचेही विविध फ्लेवर्स
बाजारात विविध कंपन्यांची उटणी उपलब्ध असतात. महिला बचत गटांकडून तयार केलेल्या उटण्याला ग्राहकांची विशेष पसंती मिळते. सर्वसाधारणपणे प्रतिकिलो १५० ते २०० रुपयांपर्यंत भाव असतो. ग्राहकांच्या मागणीनुसार २५ ग्रॅम व ५० ग्रॅम अशी पाकिटेही अनुक्रमे १० रुपये आणि २० रुपयांना विकतो, असे दादरमधील विक्रेत्यांनी सांगितले. आम्ही गेली अनेक वर्षे सुटे उटणे खरेदी करतो. या वर्षी विविध प्रकारची उटणी जरी मिळत असली तरीदेखील आम्ही सुटे उटणेच खरेदी करणार, असे काही ग्राहकांनी सांगितले. दरवर्षी तेच उटणे आम्ही वापरतो़ बाजारात चंदन उटणे, गुलाब उटणे देखील उपलब्ध आहे.