दिवाळीचं कवित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2015 00:40 IST2015-11-29T00:40:00+5:302015-11-29T00:40:00+5:30
आमच्या जुन्या चाळीतला एक मल्याळी शेजारी आहे. केरळी असल्याने फावल्या वेळातला कॉम्रेड आहेच. त्याचा जवळपास तीसेक वर्षे फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. एकेकाळी त्याच्याकडे

दिवाळीचं कवित्व
- डॉ. दीपक पवार (दांडपट्टा)
आमच्या जुन्या चाळीतला एक मल्याळी शेजारी आहे. केरळी असल्याने फावल्या वेळातला कॉम्रेड आहेच. त्याचा जवळपास तीसेक वर्षे फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. एकेकाळी त्याच्याकडे लोकांची रीघ लागायची. पासपोर्ट साईझ फोटोपासून ते लग्नसमारंभांच्या फोटोंपर्यंत सर्व प्रकारच्या फोटोसाठी वर्दळ असायची. अमुक एक फोटो बरा निघाला नाही, तो पुन्हा काढा, असे लाडिक हट्टही त्यात असायचे. स्त्रियांची गर्दी विशेष असायची. त्यांना मेकअपला वेळ लागायचा. बहुतेकदा दाखवायच्या मुलींचे सुटे आणि इतरांचे जत्थ्याने फोटो निघायचे. वाढदिवस, हळद वगैरेंचेही फोटो असायचे. पण प्रत्येक प्रिंटला पैसे पडत असल्याने नेमके किती फोटो काढायचे यावर बंधनं आली. फोटो काढले की अल्बम लागायचे. ते जपून ठेवावे लागायचे आणि विशेषत: सण-समारंभांना आलेल्या लोकांना ते दाखवावे लागायचे. हा कार्यक्रम सर्व नातेवाइकांकडचा सर्वाधिक उबगवाणा आहे यावर लोकांचं एकमत असलं तरी आपल्या घरात हे उद्योग करणं कुणी थांबवायचं नाही. लग्नांच्या व्हिडीओ कॅसेट्स तयार करणे, त्या आल्या-गेलेल्या प्रत्येकाला दाखवणे आणि त्याची नव्या उत्साहाने चर्चा करणे यात विशेषत: स्त्रियांचा हातखंडा होता. गावांमध्ये लग्नात समृद्धी दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे सिनेमा दाखवणे. तो शक्यतो पूजा, गोंधळ या दिवशी दाखवला जायचा. तो सिनेमा सुरू होण्याआधी ही व्हिडीओ कॅसेट सर्वांना सक्तीने पाहायला लागायची. काही शहाणे लोक तेवढा काळ झोप काढून घ्यायचे.
मधल्या काळात डिजिटल कॅमेरे आले, वाटेल तितके फोटो काढण्याची आणि हवे तेवढेच प्रिंट काढण्याची सोय झाली. आमच्या शेजाऱ्याचा धंदा बसला. तेव्हापासून तो ‘ये दिवाली कुछ ठीक नहीं’ असं म्हणतोय. मग मोबाइल आणि पुढे स्मार्टफोन आले. नंतर तर देशाचे पंतप्रधानच सेल्फी काढून पाठवू लागले, मागवू लागले. त्यामुळे तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का, त्याचा कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे आणि किती जीबीची क्षमता वाढवून घ्यायचीय हेच चर्चेचे विषय झाले आहेत. त्यामुळे अक्षरश: क्षणोक्षणी लोक फोटो काढून ते व्हायरल करत असताना आमचा हा फोटोग्राफर त्यात कुठेच नाही. म्हणजे त्याचा धंदा बसलाय असं नाही. त्यानेही पीसी घेतलाय. कॅमेरे जरा बरे घेतलेत. पण त्याच्या धंद्याची आधीची शान राहिलेली नाही. असं किती धंद्यांचं झालं असेल आणि त्यामुळे मुंबई शहराचं रूप कसं बदललं असेल?
उदाहरणच द्यायचं तर एकेकाळी एसटीडी बूथचे मालक राजासारखे वागायचे आणि पीसीओबाहेर रांगा लागायच्या. आता एसटीडी ही संकल्पना कालबाह्य झाल्यात जमा आहे. लोक मोबाइलचा वापर मिस्ड कॉल द्यायला करतात आणि कुठल्या कंपनीच्या किती रुपयाच्या रिचार्जवर किती रुपयाचा टॉकटाइम हा चर्चेचा विषय असतो. लोक फोन करून माझा रिचार्ज मार असं म्हणतात. नेटपॅक आहे की नाही हा आता कळीचा प्रश्न झालाय. त्यामुळे एकेकाळी सायबर कॅफेत जाऊन गेम्स खेळणारे लोक कुठेही बसल्याबसल्या ही हौस भागवू लागलेत. एकेकाळी कॅसेट्स आणि मग सीडीज्वर गाणी घेणं हा मित्रमैत्रिणींचा आवडता कार्यक्रम होता. मग ते पेनड्राईव्हवर आणि ब्लूटूथवर आलं. आता हजारो गाणी डाऊनलोड करता येतात. त्यामुळे लोकांच्या कानाला कायम हेडफोन लागलेले असतात. रस्त्यारस्त्यांवर अधिकृत-अनधिकृत दुकानांमधनं या वस्तू खरेदी करणाऱ्यांची झुंबड उडाली आहे. शुद्धतावादी म्हणतात की हे सगळं चायना मार्केट आहे. इथल्या वस्तू टिकत नाहीत. पण टिकणाऱ्या वस्तू हव्यात कुणाला? दर चार दिवसांनी नवं मॉडेल येतं, त्याचे नवे फीचर्स असतात आणि आपल्याला ते हवंच असतं. अशा वातावरणात एकेकाळी जशी मोठ्या मुलांची पुस्तकं लहानांना जायची आणि ते सगळ्या लहान मुलांना आवडायचंच असं नाही, तशी परिस्थिती झाली आहे. जुने मोबाइल आजी, आजोबांकडे जाताहेत. लहान मुलांना हातसफाईसाठी म्हणून दिले जाताहेत. रोज टीव्हीवर इतक्या माहितीचा महापूर येतोय की तुम्ही ठरवलं तरी नवी माहिती तुमच्यावर आदळायची राहत नाही. यामुळे डोळ्यांवर उजेड फेकणाऱ्या मोबाइल गॅलरीज् पानटपऱ्यांपेक्षा संख्येने जास्त वाढल्या आहेत. म्हणजे मग जुने दुकानदार कुठे गेले का त्यातल्याच काहींनी मागणी पुरवठ्याच्या न्यायाशी जुळवून घेत धंद्याची दिशा बदलली? एकेकाळी बाहेर खाणं हा चैनीचा भाग होता. आता मात्र शहराच्या प्रत्येक भागात खाऊगल्ल्या आहेत आणि तिथे लोक अक्षरश: मध्यरात्रीपर्यंत खात असतात. पाणीपुरीपासून पिझ्झ्या, डोशापासून हवं ते मिळतं आणि तेही पुन्हा हॉटेलांच्या मानाने स्वस्तात. त्यामुळे सगळी महत्त्वाची स्टेशनं अशा गाड्यांनी व्यापलेली आहेत. त्यांचं एक अर्थशास्त्र आहे. संबंधितांना ते माहीत आहे. त्यामुळे महापालिकेची गाडी येण्याआधी कुणीतरी माणूस बाइकवरून सूचना देऊन जातो. सगळे पदार्थ थोड्या वेळात गायब होतात. गाडी गेली की सगळं पूर्ववत होतं. अशा पदार्थांमुळे आरोग्य बिघडतं असं लिहिलेल्या पेपरांच्या पुरवण्यांवरच हे पदार्थ खाल्ले जातात.
आपला भवताल असा बदलतोय. लोक नटताहेत, सजताहेत. सेल्फ्या काढून फेसबुकला टाकताहेत. आता त्यांना मोदी, नितीश यांचं काही घेणंदेणं नाही. सुटी संपली आणि पुन्हा गर्दीत शिरायचं याचं त्यांना दु:ख आहे. पण आहे तोवर सर्वस्वाने बुडून आत्मकेंद्री, उपभोगवादी जगण्याची आपल्या सगळ्यांची कला लक्षणीय आहे. अनुकरणीय आहे की नाही ते माहीत नाही.