महागाईतही दिवाळी गोडच
By Admin | Updated: October 21, 2014 23:00 IST2014-10-21T23:00:55+5:302014-10-21T23:00:55+5:30
दिवाळीत फटाके वाजविण्याची परंपरा पूर्वीपासून असल्याने दिवाळीपूर्वी दहा - पंधरा दिवस अगोदरच बाजारात फटाक्यांची दुकाने सजली जातात.

महागाईतही दिवाळी गोडच
अमुलकुमार जैन, बोर्ली-मांडला
दिवाळीत फटाके वाजविण्याची परंपरा पूर्वीपासून असल्याने दिवाळीपूर्वी दहा - पंधरा दिवस अगोदरच बाजारात फटाक्यांची दुकाने सजली जातात. कितीही महागाई असली तरी सर्वसामान्य माणूस आपल्या ऐपतीप्रमाणे सण साजरा करतो. यंदा महागाई वाढली असली तरी ग्राहकांनी वस्तू खरेदीत काही पाठ फिरवलेली नाही. दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसोबतच खास दिवाळ सणासाठी विविध वस्तू खरेदी करण्याकरिता नागरिकांची बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे.
दिवाळी सणात कराव्या लागणाऱ्या फराळाच्या पदार्थांसाठी लागणाऱ्या वस्तूंचे दरही वाढलेले आहेत, त्यामुळे काहीजण रेडिमेड फराळाकडे वळलेले आहेत. रंगीबेरंगी राजस्थानी मेडच्या पणत्या आणि प्लास्टिकच्याही पणत्या बाजारात दाखल झालेल्या आहेत. आकाशकंदील, पारंपरिक चांदणी यासोबतच फटाक्यांचे विविध प्रकार, पणत्या, रांगोळी, छाप, रंग, सुगंधी अत्तर, परफ्यूम, भेटवस्तू, शुभेच्छापत्रे आदी वस्तूंनी बाजारपेठ सजली असून बाजारात विविध प्रकारचे आकाशकंदील सध्या लक्ष वेधून घेत आहेत. यात प्रिंटेड आकाश कंदील, कापडी झुंबर, राजस्थानी कंदील यांना मोठी मागणी असून पारंपरिक चांदणी ही नव्या प्रकारात सध्या दिसून येत आहे. त्यांची किंमत ३० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत आहे, तर आकाशकंदिलाची किंमत ही ३०० रुपयांपासून १५०० रुपयापर्यंत आहे.