महापालिकेला आरटीपीकडून दिवाळी भेट

By Admin | Updated: October 15, 2014 04:52 IST2014-10-15T04:52:00+5:302014-10-15T04:52:00+5:30

अस्वच्छ, असुरक्षित अशी महिला मुताऱ्यांची अवस्था, तरीही तुम्ही साजरी करणार स्वच्छ, आनंदी दिवाळी, म्हणूनच तुम्हाला दिवाळीच्या विशेष शुभेच्छा

Diwali gift from RTP to Municipal Corporation | महापालिकेला आरटीपीकडून दिवाळी भेट

महापालिकेला आरटीपीकडून दिवाळी भेट

मुंबई : ‘अस्वच्छ, असुरक्षित अशी महिला मुताऱ्यांची अवस्था, तरीही तुम्ही साजरी करणार स्वच्छ, आनंदी दिवाळी, म्हणूनच तुम्हाला दिवाळीच्या विशेष शुभेच्छा...,’ अशा आशयाचा मजकूर लिहून वास्तव दर्शवणारे शहरातील महिला मुताऱ्यांचे फोटोसह ग्रिटिंग्ज कार्ड्स तयार करण्यात येत आहेत. महापालिकेचे आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राइट टू पी कार्यकर्ते हे ग्रिटिंग्ज कार्ड्स तयार करत आहेत.
मुंबई शहर आणि उपनगर परिसरात महिलांना मोफत, स्वच्छ, सुरक्षित, सार्वजनिक मुताऱ्या असाव्यात यासाठी तीन वर्षांपूर्वी राइट टू पी (आरटीपी) ही चळवळ उभी राहिली. अडीच वर्षांनंतर २०१४ मध्ये महापालिका आयुक्तांना आरटीपी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ मिळाली. यानंतर तरी महिला मुताऱ्यांची अवस्था सुधारेल, अशी अपेक्षा होती. मात्र, बैठका, चर्चा होऊनही महिला मुताऱ्यांमध्ये काहीही फरक पडलेला नाही. मुताऱ्यांची अवस्था वाईट असल्यास त्याचा फोटो आणि माहिती गुगल मॅपवर टाकण्याचे आवाहन केले आहे. अनेक फोटो आले आहेत. यापैकी काही फोटो निवडून आणि आम्ही काढलेले फोटो घेऊन हे ग्रिटिंग्ज कार्ड्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती आरटीपी कार्यकर्त्या सुप्रिया सोनार यांनी दिली.
महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पहिले ग्रिटिंग कार्ड पाठवण्यात येणार आहे. आयुक्तांशी भेटून चर्चा केली, त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र अजूनपर्यंत कोणतेही बदल झालेले नाहीत. अनेकदा महापालिका प्रशासनाशी संपर्क साधून, माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून मुताऱ्यांची अवस्था दाखवण्यात आली. मात्र, कोणताही बदल झालेला नाही. आदेश निघाले, अंमलबजावणी झालेली नाही, यामुळेच आता दिवाळीला त्यांना अशाच प्रकारे शुभेच्छा देण्याचे ठरवले असल्याचे सुप्रिया यांनी सांगितले.

Web Title: Diwali gift from RTP to Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.