Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही दिवाळी पर्यावरणपूरक कंदिलांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 01:21 IST

प्लॅस्टिकबंदीचा फटका; कार्टून, पुठ्ठा कंदिलांना पसंती, घर व कार्यालयांसाठी छोट्या कंदिलांची माळ

मुंबई : दिवाळी म्हटले की, खरेदीच्या अन्य मुद्द्यांप्रमाणे सर्वाधिक आकर्षण असते ते कंदिलाचे़ घर, कार्यालय, इमारत, चौक, नाका, अशा ठिकाणी कंदील लावून शुभेच्छा देण्याची प्रथा वर्षानुवर्षे मुंबईकर जपत आहेत़ राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी लागू केल्याने या वर्षी कागदी व कापडी कंदिलांना अधिक मागणी आहे़कंदील घेण्यासाठी माहिमची कंदील गल्ली, दादर मार्केट, भेंडी बाजार येथेच एकच गर्दी होते आहे. दुसरीकडे लायटिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या लोहार चाळीतही इलेक्ट्रिक कंदिलांचे नवनवीन प्रकार विक्रीसाठी आहेत़ छोट्या कंदिलांची माळ हा सर्वाधिक विकला जाणारा प्रकार असल्याचे येथील विक्रेत्याने सांगितले़ घरात रोषणाईसाठी इलेक्ट्रॉनिकचे अनेक छोटे-छोटे प्रकार येथे उपलब्ध आहेत.माहिम येथील कंदील गल्लीत गेली अनेक वर्षे कंदिलांचे नाना प्रकार पाहायला मिळतात. रात्रीच्या वेळीही येथे खरेदीसाठी एकच गर्दी असते़ दरवर्षी येथे कंदिलाचे नवनवीन प्रकार बघायला मिळतात़ अगदी ४ ते ५ फुटांपर्यंत मोठे कापडी कंदील येथे विक्रीसाठी ठेवलेले असतात़ हाताने तयार केलेले कंदील येथे उपलब्ध असल्याने पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरे करणारे येथे आवर्जून कंदील घेण्यासाठी येतात़ दादर मार्केटमध्येही कंदिलाचे अनेक प्रकार या वर्षी उपलब्ध आहेत.आकाशकंदील टांगण्याची लोकप्रतिनिधींत स्पर्धालोकप्रतिनिधी आकाशकंदिलावर आपली छबी झळकावत नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. रस्त्या-रस्त्यावर, चौका-चौकात असे आकाशकंदील दिसून येत आहेत. येत्या निवडणुकीचा वेध घेत लोकप्रतिनिधींनी मतदारांना लक्ष्य केले आहे..कंदिलांचे साहित्य खरेदी करून होम मेड कंदील बनविण्याकडे नागरिकांचा कल आहे. मोठे कंदील बनविण्यासाठी एक तासाचा अवधी, तर लहान कंदील बनविण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा अवधी लागत असल्याचे माहिम येथील हर्षदा होडावडेकर यांनी सांगितले.रांगोळी पॅडदरवर्षी बाजारात ग्राहकांकडून रांगोळी आणि विविध रंगांची खरेदी केली जात असत. मात्र, यंदा बाजारात रेडीमेड रांगोळी पॅड आले आहेत. पुठ्ठ्यावर विविध रंगातील चमकीने रांगोळी तयार करण्यात आली आहे. रांगोळी पॅडचा वापर कुठेही करता येऊ शकतो. रांगोळी पॅडच्या आकारानुसार त्यांची किंमत ठरते. रांगोळीचे साचे, रांगोळीसाठी रंगही बाजारात आले आहेत. रांगोळी खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचेही दिसून आले.इकोफ्रेंडली कंदिलामध्ये साडी आणि पेपरचा वापर करून, आकर्षक आकाशकंदील तयार करण्यात आले आहेत. अनेक वर्षे या कंदिलांचा वापर करू शकतो. दिवाळीच्या रोषणाईमध्ये हे कंदील मोहक दिसतात. - अभिजीत साटम, कंदील विक्रेता

टॅग्स :दिवाळी