Diwali 2025: आकाशदिव्यांनी उजळला बाजार, मिळाला रोजगार
By सचिन लुंगसे | Updated: October 20, 2025 10:38 IST2025-10-20T10:37:05+5:302025-10-20T10:38:16+5:30
या व्यवसायाने रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

Diwali 2025: आकाशदिव्यांनी उजळला बाजार, मिळाला रोजगार
सचिन लुंगसे, उपमुख्य उपसंपादक
ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वत्र झगमगाट करणारे रंगीबेरंगी आकाशदिवे आता केवळ सजावटीचा भाग नसून, एक मोठा हंगामी व्यवसाय बनले आहेत. मोठ्या शहरांमध्ये त्यांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मुंबईत माहिमची कंदील गल्ली कित्येक वर्षांपासून दिवाळीचे आकर्षण आहे. पण, आता मुंबईच्या कानाकोपऱ्यातील बाजारपेठांतही अशा गल्ल्या तयार झाल्या आहेत. लालबागच्या मार्केटपासून दादर, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, बोरिवलीसोबतच विलेपार्लेसह अनेक ठिकाणी आता रस्ते कंदिलांनी भरून जात आहेत. या व्यवसायाने रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
बाजारात ४० रुपयांच्या छोट्या कंदिलापासून अगदी ५ ते १० हजार रुपयांपर्यंतचे कंदील उपलब्ध आहेत. सजावटीच्या छोट्या कंदिलापासून सोसायटीत लावण्यासाठीच्या मोठ्या कंदिलांनाही मोठी मागणी आहे. आकाशदिवे लोककलेचे सुंदर उदाहरण देत आहेत. चौकोनी, पंचकोनी, नक्षीदार, गोल, तारकाकृती किंवा झुलत्या डिझाइनचे कंदील दिसत आहेत. रंगीत कागद, ट्रान्स्परंट प्लास्टिक शीट, बांबू, लाकूड, फॅब्रिक, तसेच मेटल असे विविध प्रकारचे साहित्य वापरण्यात येते. काहींवर वारली, मधुबनी, गोंड किंवा फुलांच्या आकृत्या असतात.
काळ बदलला तसे कंदिलांतही बदल झाले. ते पारंपरिकबरोबरच एलईडी लाइटिंगचेही बाजारात आले आहेत. हे कमी वीज वापरतात आणि टिकाऊ असतात. स्विच-ऑपरेटेड आणि कलर-चेंजिंग कंदील लोकप्रिय आहेत. फॅब्रिक आणि मेटल सजावटीसाठी, घराच्या इंटिरियर डिझाइनचा भाग म्हणून ते वापरले जात आहेत. ते रीसायकल आणि इको-फ्रेंडली साहित्यांपासून बनवलेले असतात.
पारंपरिक कंदिलांना पसंती
हातगुणी कलाकार, कारागीर, महिला बचतगट आणि विद्यार्थीदेखील कंदील तयार करून विक्री करत आहेत. बाजारपेठांमध्ये कागदी, बांबू, थर्माकोल, मेटल आणि फॅब्रिकचे कंदील विविध डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत. हाताने बनवलेल्या पारंपरिक कंदिलांची किंमत ५० ते ५०० रुपये आहे, तर एलईडी लाइट्सच्या आधुनिक डिझाइन्सची किंमत १ हजार रुपयांपर्यंत आहे.
विशेषतः पर्यावरणपूरक आणि रीसायकल मटेरियलमधून बनवलेले आकाशदिवे सध्या ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. बॅटरी-ऑपरेटेड दिवेही बाजारात लोकप्रिय होत आहेत. दुसरीकडे बाजारपेठेत चीनमधून येणाऱ्या स्वस्त एलईडी कंदिलांमुळे स्थानिक उत्पादकांवर काहीसा परिणाम झाला आहे. मात्र, व्होकल फॉर लोकल मोहिमेमुळे भारतीय उत्पादने खरेदी करण्याची जागृती वाढत आहे. त्यामुळे हातगुणी कंदिलांना चांगली मागणी आहे.