Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना मिळणार शासकीय जमिनीवर सदनिका, १ हजार ५५० सदनिका मिळण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 02:33 IST

दिवाळीनिमित्त माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पुढाकाराने दिव्यांगांना वडाळा ट्रक टर्मिनल, आणिक डेपोसमोरील दिव्यांगांसाठी आरक्षित शासकीय जमिनीवर १ हजार ५५० सदनिका विनामूल्य उपलब्ध होणार आहेत.

मुंबई : दिवाळीनिमित्त माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पुढाकाराने दिव्यांगांना वडाळा ट्रक टर्मिनल, आणिक डेपोसमोरील दिव्यांगांसाठी आरक्षित शासकीय जमिनीवर १ हजार ५५० सदनिका विनामूल्य उपलब्ध होणार आहेत. तसेच २६ जुलै २००५ रोजीच्या अतिवृष्टीतील पूरग्रस्त दिव्यांगांना एमएमआरडीए-एसआरए आणि म्हाडा गृहनिर्माणाच्या सदनिका वितरित करू, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.राज्यातील दुर्बल-उपेक्षित-शोषित, अंध-अपंग दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात विशेष दिवाळी भेट देण्यासाठी तसेच म्हाडा आणि महानगरपालिका संबंधित प्रलंबित समस्या कायमस्वरूपी सोडवण्याकरिता नुकतीच मंत्रालयात बैठक झाली. या वेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, अपंग साधना संघ संस्थेचे सचिव यशवंत पाटील, शासकीय अधिकारी, मंत्री यांची उपस्थिती होती.म्हाडाद्वारे अपंग व्यक्तींना सदनिका विक्रीत कोणतीही आर्थिक सवलत देण्यात येत नाही. कायद्याच्या कलम ४३ नुसार अपंग व्यक्तींना घरकुलासाठी शासकीय जमीन बाजारभावाच्या ५ टक्के भोगवटा करून देण्याचे शासकीय आदेश आहेत. गेली २२ वर्षे म्हाडा प्रशासनाकडून अपंग कायद्याची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे वडाळा ट्रक टर्मिनल, आणिक डेपोसमोर सर्व्हे क्रमांक ४, हिस्सा क्रमांक ४/३ अपंग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. साडेदहा एकर जमिनीवर म्हाडा प्रशासनाने अपंग व्यक्तींना घरकुल, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, उत्पादन-पणन केंद्र, विक्री केंद्र विनामूल्य बांधून देण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. संबंधित विभागांकडून गेली २२ वर्षे अपंगांवर अन्याय होत आहे. त्यामुळे आवश्यक सर्व सुविधा असलेल्या सदनिका विनामूल्य बांधून देण्याचे निर्देश बडोले यांनी म्हाडा प्रशासनाला दिले. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा रदिया जैन्नुदीन चंपा, श्रीराम पाटणकर, यशवंत पाटील, सुरेंद्र लाड, सूर्यकांत लाडे, चंद्रकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :घर