राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांना मोकळीक
By Admin | Updated: August 18, 2014 02:04 IST2014-08-18T02:04:38+5:302014-08-18T02:04:38+5:30
राष्ट्रीय उद्यानात नव्या सुटका आणि पुनर्वसन केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून, आता येथील बिबट्यांना आणखी मोकळीक मिळणार आहे.

राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांना मोकळीक
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नव्या सुटका आणि पुनर्वसन केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून, आता येथील बिबट्यांना आणखी मोकळीक मिळणार आहे. मानवी वस्तीत हल्ला केल्यानंतर ठेवण्यात येणाऱ्या पिंजऱ्याची जागा अत्यंत कमी असल्यामुळे बिबट्यांना वावर करणे कठीण होते. त्यामुळे उद्यान प्रशासनाने हा नवा प्रकल्प हाती घेतला आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सुटका व पुनर्वसन केंद्राने या नव्या सुटका केंद्राची उभारणी केली आहे. जुन्या सुटका केंद्रामध्ये दहा बाय दहापेक्षाही कमी जागा असल्यामुळे प्राण्यांना त्यात वावर करणे कठीण होते. त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लगेचच येथील बिबट्यांना नव्या सुटका केंद्रांमध्ये ठेवण्यात येईल.
सध्या येथील सुटका केंद्रामध्ये २० पेक्षा अधिक बिबट्यांचा समावेश आहे. ज्या वेळी बिबट्यांची सुटका करण्यात येते त्या वेळेस त्यांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न उद्यान प्रशासनास भेडसावतो. काही वेळेस तर बिबट्यांना पकडण्यात आलेल्या पिंजऱ्यांच्या कमी जागेमध्ये कित्येक दिवस काढावे लागतात.
उद्यान तयार केलेल्या सुटका केंद्रांमध्ये प्राण्यांसाठी पोषक वातावरण तयार केले जाणार आहे. जेणेकरून प्राण्यांना जंगलाप्रमाणे वातावरणाची सवय होईल. या प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले असून काही महिन्यांतच याचा शुभारंभ करण्यात येईल. या प्रकल्पामुळे प्राण्यांना सुटकेचा नि:श्वास मिळणार असून, अधिक मोकळीकही मिळेल, असे उद्यान प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)