पर्यटनात जिल्ह्याची आघाडी
By Admin | Updated: January 16, 2015 22:50 IST2015-01-16T22:50:37+5:302015-01-16T22:50:37+5:30
प्राचीन आणि मध्ययुगीन काळापासून इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच यांनी रायगडला व्यापाराचे केंद्र बनविल्याचे ऐतिहासिक दस्तऐवजावरून स्पष्ट होते.

पर्यटनात जिल्ह्याची आघाडी
आविष्कार देसाई, अलिबाग
प्राचीन आणि मध्ययुगीन काळापासून इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच यांनी रायगडला व्यापाराचे केंद्र बनविल्याचे ऐतिहासिक दस्तऐवजावरून स्पष्ट होते. आजही जगभरातील लहान-मोठे देश व्यापार आणि विशेष करून पर्यटनासाठी रायगड जिल्ह्याशी जोडलेले असून पूर्वीचीच परंपरा वृध्दिंगत होताना दिसत आहे.
जगातील ६५ देशांतील १,०२५ परदेशी नागरिकांनी रायगड जिल्ह्यात विविध कारणांसाठी गेल्या वर्षभरात वास्तव्य केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने पर्यटन आणि कामगार व्हिजावर येणाऱ्यांची संख्या सर्वाधिकआहे. व्यापार आणि पर्यटनाच्या दिशेने भविष्यात नियोजित वाटचाल केल्यास जिल्हा जगाच्या आर्थिक पटलावर आपली छाप उमटविण्यास सक्षम होईल. त्यामुळे सरकार, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनीही त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
गतवर्षीच्या तुलनेत २०१३ या वर्षात विविध देशातील ९८० नागरिकांनी रायगड जिल्ह्याला भेट दिली होती. तर २०१४ या कालावधीत ६५ देशांतील तब्बल १०२५ परदेशी नागरिक जिल्ह्यात विविध कारणांनी वास्तव्यास होते. यात कामगार व्हिजावर ७३ नागरिक येथे आले होते. उद्योग-व्यापारासाठी नऊ, घरकामासाठी आठ, विद्यार्थी सात, शिक्षक, प्रकल्प व्हिजावर प्रत्येकी दोन असे एकूण १०३ परदेशी नागरिक रायगडात वास्तव्यास होते. उर्वरित ९२२ परदेशी नागरिकांनी पर्यटक व्हिजाचा वापर केला होता. त्याचप्रमाणे १४ पाकिस्तानी नागरिकही आले होते.
नववर्षात १ जानेवारी २०१५ ते आजपर्यंत १४८ परदेशी नागरिकांनी जिल्ह्यात हजेरी लावली आहे. मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला फार मोठ्या संधी असून या क्षेत्रात गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. अलिबाग, मुरुड आणि माथेरान ही ठिकाणे परदेशी पर्यटकांची आवडती आहेत. या ठिकाणांसह जिल्ह्यातील धार्मिक, पुरातत्व, निसर्ग आणि कृषी पर्यटन स्थळांचा विकास केल्यास येथे परकीय चलन येऊन आर्थिक सुबत्ता येण्यास मदत मिळू शकते.
जिल्ह्यात पर्यटनवाढीच्या दिशेने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. मात्र हा विषय सरकारी अथवा राजकीय पातळीवर गंभीरपणे घेतल्याचे दिसून येत नाही. मुंबई जवळच असल्याने अलिबागमध्ये पर्यटनवाढीला सर्वाधिक संधी आहेत. या टुरिस्ट बेल्टमध्ये मनी एक्सचेंज करण्याची सुविधा नाही. याचाही सर्वाधिक फटका परदेशी नागरिकांसह स्थानिक पर्यटनाला बसतो आहे.