जिल्ह्यालाही स्वाइनची भीती
By Admin | Updated: February 20, 2015 22:54 IST2015-02-20T22:54:53+5:302015-02-20T22:54:53+5:30
रायगड जिल्ह्यात खोपोली येथील राजेश धस (४१) यांच्या मुंबईत झालेल्या मृत्यूने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्यालाही स्वाइनची भीती
जयंत धुळप - अलिबाग
रायगड जिल्ह्यात खोपोली येथील राजेश धस (४१) यांच्या मुंबईत झालेल्या मृत्यूने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये दोन महिला स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्या असून त्यापैकी कमला पाटील यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या रुग्ण पनवेलमधीलच वेदिका कोलहर यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
या व्यतिरिक्त एकूण १२ संशयित स्वाइन फ्लू रुग्ण निष्पन्न झाले असून त्यातील ११ रुग्णांवर एमजीएम कळंबोली येथे तर एका रुग्णावर येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती स्वाइन फ्लू नियंत्रण यंत्रणेचे नोडल अधिकारी तथा रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
खाजगी रुग्णालयांनाही रुग्ण दाखल करण्यास परवानगी देण्यात आली असून नागरिक येथेही दाखल होत आहेत. रायगड जिल्ह्यात अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत, तर खाजगी रुग्णालयांनाही रुग्ण दाखल करुन घेण्याची परवानगी देण्यात आल्याचे डॉ.गवळी यांनी सांगितले.
नगरपालिका स्तरावर जनजागृतीसाठी प्रसारमाध्यमांचा अधिकाधिक उपयोग करुन घ्यावा त्याचप्रमाणे गावांमध्ये दर्शनी ठिकाणी माहिती फलकांद्वारे नागरिकांना जागृत करावे. स्वच्छ पिण्याचे पाणी, औषधे आदींच्या बाबत दक्षता घ्यावी. आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार नाही याकडेही पाहावे, असेही जिल्हाधिकारी भांगे यांनी सांगितले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी नागरिकांना पाणीपुरवठा करताना त्या पाण्याची नियमित तपासणी करावी, तापसदृश परिस्थिती आल्यास काळजी घ्यावी, स्वच्छता राखावी असे सांगितले.
आयोजित बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) किरण पाणबुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.ए. पाटोळे, उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन तेजस समेळ, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर आदी उपस्थित होते.
४गावपातळीवर जनजागृती उपक्रम राबविले जात असून स्वाइन फ्लूसंदर्भात शासकीय आरोग्य यंत्रणेने अधिक कार्यतत्पर राहून नागरिकांना विश्वास द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी स्वाइन फ्लू संदर्भात करावयाच्या कारवाईबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले आहे.
४रायगड जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लूसंदर्भात तालुका पातळीवर तसेच गावपातळीवर देखील मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक असून करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. संबंधित शासकीय यंत्रणांनी अधिक कार्यतत्परता दाखविली तर नागरिकांना दिलासा मिळेल. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी नागरिकांना पाणीपुरवठा करताना त्या पाण्याची नियमित तपासणी करावी व स्वच्छता राखावी असे सांगितले.