जिल्ह्यात २ लाख गणराय
By Admin | Updated: August 27, 2014 00:06 IST2014-08-27T00:06:21+5:302014-08-27T00:06:21+5:30
बाप्पांचे आगमन अवघे दोन दिवसांवर आले असताना, सोशल मीडियावर श्रींच्या छायाचित्रांसह मी येतोय... असे मजकूर अपलोड होत आहेत.

जिल्ह्यात २ लाख गणराय
पंकज रोडेकर, ठाणे
बाप्पांचे आगमन अवघे दोन दिवसांवर आले असताना, सोशल मीडियावर श्रींच्या छायाचित्रांसह मी येतोय... असे मजकूर अपलोड होत आहेत. ठाणे शहर व ग्रामीण आणि पालघर जिल्ह्यात येत्या शुक्रवारी सुमारे दोन लाख ३१ हजार बाप्पांचे आगमन होणार आहे.
घरगुती बाप्पांचा आकडा हा लाखमोलाचा झाला आहे. ज्या सामाजिक भावनेतून गणेशोत्सव सुरू झालेल्या सार्वजनिक उत्सवाचा आकडा सुमारे साडेचार हजारांवर पोहोचला आहे. मात्र, शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांत सार्वजनिक गणेशोत्सवाचा आकडा तिप्पट आहे. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यात सुमारे ५१ हजार तर ठाणे जिल्ह्यात ३४ हजार बाप्पांचे आगमन होणार आहे. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा सार्वजनिक एक हजार ४८ आणि घरगुती एक लाख ४८ हजार ८२१ गणपती बाप्पांची स्थापन होणार आहे. यामध्ये सार्वजनिकमध्ये सर्वाधिक गणराज कल्याण परिमंडळांत विराजमान होणार आहेत. कल्याणात सार्वजनिक ३०४ तर घरगुती ४० हजार १५० बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. उल्हासनगरात सार्वजनिक २८४ तर घरगुती ३७ हजार ८८१ बाप्पांची स्थापना केली जाणार आहे. वागळे इस्टेटमध्ये सार्वजनिक २१७ तर घरगुती २३ हजार ४७९ बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. भिवंडीत सार्वजनिक १५३ तर घरगुती नऊ हजार ५०० बाप्पांची तर सर्वात कमी ठाणे शहरात सार्वजनिक ९५ तर घरगुती १७ हजार ७८ बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्याने ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकाच्या हद्दीत यंदा सार्वजनिक ९३७ आणि घरगुती २९ हजार ५५९ मंगलमूर्ती बाप्पांचे आगमन होणार आहे. नव्याने स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यात दोन हजार ४२६ सार्वजनिक आणि ४८ हजार १३५ घरगुती बाप्पांची स्थापना होणार आहे. मात्र, पालघर जिल्ह्यात ठाणे आणि जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आकड्यापेक्षा ५०० ने अधिक आहे.