Join us
Daily Top 2Weekly Top 5

निर्मलनगरमध्ये ५२४ झोपडीधारकांना प्रमाणपत्रांचे वाटप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 05:49 IST

अपात्र झोपडीधारकांना पात्र करण्यासाठीची अभय योजना योग्यरीत्या राबवली जात नसल्याने अनेक  अडचणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई  : निर्मलनगर प्रकरणात ५२४ पात्र झोपडपट्टीधारकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच २७९ पात्र झोपडपट्टीधारकांकडून आवश्यक कागदपत्रांसाठी वर्तमानपत्रातून २६ नोव्हेंबर, २०२५ आणि       १८ फेब्रुवारी २०२६  रोजी जाहिराती देऊन प्रतिसाद मागवण्यात आला होता. त्यापैकी ६४ जणांनी प्रतिसाद दिला. उर्वरित २१५ पात्र झोपडीधारकांनी अर्ज केल्यानंतर त्यांना निर्धारित वेळेत प्रमाणपत्रे देण्यात येतील, असे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.

अपात्र झोपडीधारकांना पात्र करण्यासाठीची अभय योजना योग्यरीत्या राबवली जात नसल्याने अनेक  अडचणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सायन परिसरातील साई सिटी, निर्मलनगर व निसर्ग संस्थेचे पुनर्विकास प्रकल्प रखडल्याबाबत कॅप्टन आर. सेल्वन यांनी लक्षवेधी सूचना मांडली. या चर्चेत अनंत(बाळा) नर, योगेश सागर यांनी सहभाग घेतला.

मंत्री देसाई यांनी सांगितले, साई सिटी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्रकरणात पूर्वी नियुक्त विकासकाची नियुक्ती १४ डिसेंबर २०२४ रोजी रद्द केली. त्यानंतर एप्रिल ते जुलै २०२५ दरम्यान चार वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. अंतिम निविदा काढण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले. दरम्यान, या विषयावर मुंबईतील विविध आमदारांच्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी गृहनिर्माण मंत्र्यांसह एसआरए अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Certificates Distributed to 524 Slum Dwellers in Nirmal Nagar

Web Summary : 524 Nirmal Nagar slum dwellers received certificates. 215 more will get theirs upon application. Difficulties in slum redevelopment were discussed in the Assembly. A meeting with SRA officials is planned to address MLA concerns.
टॅग्स :झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण