राज्यात बायोमेट्रिक पद्धतीने धान्याचे वाटप

By Admin | Updated: January 7, 2015 01:33 IST2015-01-07T01:33:21+5:302015-01-07T01:33:21+5:30

राज्यात पुढील सहा महिन्यांत बायोमेट्रिक पद्धतीनेच रेशन दुकानांवर धान्याचे वाटप केले जाणार आहे. यापूर्वी प्रायोगित तत्त्वावर केलेला प्रयोग यशस्वी झाला

Distribution of grains in biometric system in the state | राज्यात बायोमेट्रिक पद्धतीने धान्याचे वाटप

राज्यात बायोमेट्रिक पद्धतीने धान्याचे वाटप

संदीप प्रधान - मुंबई
राज्यात पुढील सहा महिन्यांत बायोमेट्रिक पद्धतीनेच रेशन दुकानांवर धान्याचे वाटप केले जाणार आहे. यापूर्वी प्रायोगित तत्त्वावर केलेला प्रयोग यशस्वी झाला असून, किमान २० टक्के धान्य काळ्या बाजारात जाण्यापासून वाचते हे लक्षात आल्याने सुमारे २०० कोटींच्या या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
मागील आघाडी सरकारने पुण्यातील शिरुर, औरंगाबाद व सांगली येथील रेशन दुकानांवर केवळ शिधापत्रिकाधारकास बायोमेट्रिक पद्धतीने धान्य देण्याची योजना अंमलात आणली होती. ही योजना यशस्वी ठरली असून, आता राज्यातील ५२ हजार २३२ रेशन दुकानांवर बायोमेट्रिक पद्धतीने धान्य देण्याची योजना अंमलात आणण्याचे निश्चित केल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. पुढील सहा महिन्यांत ही योजना राबवली जाईल व त्याकरिता किमान २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सचिव दीपक कपूर म्हणाले की, सांगलीतील १०३ तर औरंगाबाद येथील १० रेशन दुकानांवर बायोमेट्रिक पद्धतीने वितरण करण्याची योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली होती. रेशनकार्डधारकाच्या अंगठ्याचे निशाण घेऊन त्याला धान्य दिले जात असल्याने दुसऱ्या व्यक्तीने येऊन धान्य घेऊन जाण्याचे किंवा शिधापत्रिकाधारक धान्य घेण्यास न आल्यास ते परस्पर विकून काळाबाजार करण्याची संधी उपलब्ध होत नाही. या ठिकाणी २० टक्के धान्याची बचत झाल्याचे निदर्शनास आले. रेशनकार्डधारकाने कोणत्या दिवशी, किती धान्य नेले याची प्रिंट उपलब्ध होत असल्याने चोरी शक्य नाही. राज्यात सर्वत्र बायोमेट्रिक पद्धतीने धान्यवाटप करण्याची योजना अंमलात आणण्याकरिता किती खर्च येईल व कशी अंमलबजावणी करता येईल ते निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले.

अशा प्रयोगांची महाराष्ट्रात गरज आहे. सरकारने कुठल्या दुकानात बायोमेट्रिक पद्धतीने धान्य देण्याची योजना राबवली ते मात्र आमच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलेले नाही. आम्ही सातत्याने याबाबतची माहिती देण्याची मागणी करीत आहोत. राजस्थानमध्ये केरोसिनचा तर मध्य प्रदेशात धान्याचा काळाबाजार रोखण्याकरिता असे प्रयोग झाले आहेत.
- सुरेश सावंत, रेशनिंग कृती समितीचे कार्यकर्ते

Web Title: Distribution of grains in biometric system in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.