वितरणचा भोंगळ कारभार

By Admin | Updated: October 23, 2014 23:28 IST2014-10-23T23:28:05+5:302014-10-23T23:28:05+5:30

विजेच्या कमी-जास्त होणा-या दाबामुळे मुरूड तालुक्यातील व्यावसायिक व घरगुती ग्राहक हैराण झाले आहेत.

Distribution of Distribution | वितरणचा भोंगळ कारभार

वितरणचा भोंगळ कारभार

नांदगाव : विजेच्या कमी-जास्त होणा-या दाबामुळे मुरूड तालुक्यातील व्यावसायिक व घरगुती ग्राहक हैराण झाले आहेत. कित्येक दिवसांपासून सुरू असणाऱ्या प्रकारामुळे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. वीज मंडळाच्या या विचित्र साडेसातीमुळे नागरिक संतप्त व हवालदिल झाले आहेत. मात्र समस्या दीर्घ असतानाही वीज मंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाने मुरुडकरांच्या या समस्येवर कोणतीच उपाययोजना केलेली नाही.
मुरूड तालुका हा पर्यटन तालुका म्हणून जाहीर करण्यात आलाय. मुरूड तालुक्यातील सुमारे १०० गावांना १९६५पासून ६० कि.मी. अंतरावरील धाटाव (ता. रोहा) येथील वीज केंद्रातून वीजपुरवठा सुरू आहे. इतक्या दूरवरून येणाऱ्या वीजवाहिनीला (हाय टेंशन) मधल्या अनेक गावांत जोडण्या देण्यात आल्या आहेत.
मुरूडसाठी स्वतंत्र थेट टॉवरची सातत्याने मागणी करूनही वीज मंडळाने ती पूर्ण केलेली नाही. सुनील तटकरे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री असताना विजेचा दाब वाढविण्यासाठी काही लाख रुपये खर्चून नांदगाव छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयनजीक दोन कपॅसिटर्स बसवून मंडळाने मुरूडकरांची मुस्कटदाबी केली होती. वास्तविक त्यामुळे कमी दाबाची मूळ समस्या कायम राहिली.
नियमानुसार कोणत्याही तालुक्याचे वीज सबस्टेशन ३० कि.मी.च्या परिघात हवे; तरच योग्य दाब मिळतो व वीज मंडळाबरोबरच ग्राहकांचे नुकसान होत नाही. मात्र इतक्या लांबून येणाऱ्या वीज वाहिनीवर शेकडो झंपर्स नेण्यात आल्याचे दिसते. तालुक्यात या प्रकारामुळे सायंकाळी १८० ते १२० एवढाच दाब मिळतो. प्रत्यक्षात तो २३० हवा. या प्रकारामुळे भरमसाठ वीज बिले, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे निकामी होणे, वीजपुरवठा कधीही कितीही कालावधीसाठी खंडित होणे असे प्रकार वारंवार होऊ लागले आहेत.
मुरूडसाठी थेट एक्स्प्रेस फिडरसारखी हायटेंशन लाइन टाकली गेली तरच कमी-जास्त दाबाची समस्या कायमची मार्गी लागेल, अशी प्रतिक्रिया वीज मंडळातीलच काही कर्मचारी बांधव व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Distribution of Distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.