लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाडेतत्त्वावर राहात असलेल्या नातेवाइकाचा कोणीही वारस नाही म्हणून त्याच्या मृत्यूपश्चात त्याचे दुरचे नातेवाईक संबंधित व्यक्तीचे आपण ‘कुुटुंबीय’ आहोत, असा दावा करून भाड्याच्या जागेवर हक्क सांगू शकत नाही आणि घरमालकाला त्याच्या मालमत्तेपासून वंचित ठेवू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
भाडेकरूचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा कोणी वारस नसेल किंवा त्याच्याबरोबर अन्य कोणी राहात नसेल तर संबंधित जागेचा ताबा घरमालकाला देणे आवश्यक आहे, असे न्या. संदीप मारणे यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले. वाळकेश्वर येथे ‘कपाडिया बिल्डिंग’मध्ये डॉ. आर. सी. उपाध्याय आणि त्यांची पत्नी शारदाबेन राहात होते.
या दोघांनाही मूलबाळ नव्हते. दोघांच्या पश्चात शारदाबेन यांच्या बहिणीचा मुलगा प्रदीप कुमार ललित कुमार पांड्या यांनी आपण आपल्या पत्नीसह १९५६ पासून उपाध्याय यांच्या घरात त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून राहात असल्याचा दावा केला. १९ सप्टेंबर २००३ रोजी आर. सी. उपाध्याय यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून आपल्याला ‘भाडेकरू’ जाहीर करण्यात यावे, यासाठी उपाध्याय यांनी लघुवाद न्यायालयात दावा दाखल केला.
एकही पुरावा नाहीnयातील एकही पुरावा न्यायालयात उभा राहू शकला नाही. उपाध्याय यांच्या मृत्यूपूर्वी प्रदीप कुमार त्यांच्या पत्नीसह उपाध्याय यांच्या घरी जबरदस्तीने घुसल्याचे उपाध्याय यांची मालमत्ता व बँक व्यवहार पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वकिलांनी लघुवाद न्यायालयाला सांगितले. nलघुवाद न्यायालयाने सर्व कागदपत्रे पडताळून प्रदीप कुमार यांना भाडेकरू म्हणून घोषित करण्यास नकार दिला. अपिलीय प्राधिकरणानेही प्रदीप कुमार यांचा दावा फेटाळला.
न्यायालय काय म्हणाले?उपाध्याय यांचे वकील अरविंद कामदार यांना उपाध्याय यांच्या आजाराविषयी, बँक व्यवहारांची पूर्ण माहिती होती. प्रदीपकुमार उपाध्याय यांच्याबरोबर राहात होते तर उपाध्याय यांनी बाहेरच्या व्यक्तीला बँकेचे व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी कशी दिली? असा सवाल न्या. मारणे यांनी केला. उपाध्याय यांच्या मृत्यूपूर्वी सहा महिने अगोदर प्रदीप कुमार यांनी रेशन कार्डचा पत्ता बदलला, असे न्यायालयाने म्हटले.
भाडे कायदा काय म्हणतो? महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्यानुसार, एखाद्या भाडेकरूचा आकस्मिक मृत्यू झाला तर त्याच्या पश्चात त्याची पत्नी आणि कुुटुंबाला संरक्षण मिळावे, यासाठी भाडेकरू हस्तांतरणाची तरतूद आहे. भाडेकरू हस्तांतरणाची मागणी करणारी व्यक्ती मृताचा कायदेशीर वारस असला पाहिजे किंवा त्याच्या मृत्यूच्यावेळी दावा करणारी व्यक्ती त्याच्यासोबत राहात असली पाहिजे. मात्र, या दोन्ही अटींची पूर्तता प्रदीप कुमार करत नाही, असे न्यायालयाने प्रदीप कुमार यांचा दावा फेटाळताना म्हटले.