मतदारांमध्ये निरुत्साह
By Admin | Updated: October 6, 2014 03:34 IST2014-10-06T03:34:12+5:302014-10-06T03:34:12+5:30
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात सर्व राजकीय पक्षाचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे.

मतदारांमध्ये निरुत्साह
दीपक मोहिते, वसई
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात सर्व राजकीय पक्षाचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे. केलेली विकासकामे तसेच प्रस्तावित विकासकामे यावर मतांचा जोगवा मागविण्यात येत आहे. निवडणूका जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी आपापले जाहिरनामे, वचननामे तयार करण्यास सुरुवात केली नागरी सुविधाचे प्रश्न वगळता अन्य प्रश्नांना त्यांनी स्पर्श केलेला नाही. प्रचार हा केवळ नागरी सुविधा म्हणजेच पाणी, आरोग्य, वीज वितरण व्यवस्था इ. मर्यादित बाबी भोवतीच फिरत आहे. उमेदवारांच्या भाषणातही हाच विषय हाताळण्यात येत आहे. वास्तविक या पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी, कुपोषण, साक्षरता व अन्य असंख्य समस्या स्थानिकांना भेडसावत आहेत.
जिल्हा विभाजन व चर्चगेट-डहाणू उपनगरीय रेल्वेसेवा हे दोन महत्वाचे प्रश्न मार्गी लागले. परंतु आदीवासी समाजातील बालकांमधील कुपोषण, बालमृत्यू, आदीवासींना बहाल करण्यात येणारे वनहक्क पट्टे, बेरोजगारी, दळण-वळणाची अपूरी साधने, पीकांवरील रोग, उध्वस्त झालेली केळी, नारळ, पानवेली, अन्न सुरक्षा कायद्याच्या अमलबजावणीतील त्रूटी, विस्कळीत अन्न-धान्य पुरवठा पीकवीमा योजनेचे वाजलेले तीन-तेरा व ग्रामीण भागात दरवर्षी निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई इ. महत्वाच्या विकासकामांकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात यंदा मतदान कमी होण्याचीच शक्यता अधिक आहे. निवडणूकांच्या रिंगणात उमेदवारांची भाऊगर्दी झाली असली तरी मतदारांमध्ये मात्र अनुत्साह आहे.