मुंबई - माजी सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याप्रकरणाची नव्याने सीबीआय चौकशीची मागणी करणारी तिचे वडील सतीश यांची याचिका न्या. कोतवाल यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने निबंधकांना बुधवारी दिले. आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेत केली आहे.
सालियन त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, ही याचिका महिलांविरोधातील गुन्ह्यासंबंधी आहे. त्यामुळे ही असाइनमेंट न्या. सारंग कोतवाल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाकडे आहे. त्यानंतर खंडपीठाने वरील निर्देश दिले.
पोलिस तपासावर आक्षेपसुरुवातीला पोलिसांनी केलेला तपास खरा असल्याचे वाटले. मात्र, नंतर समजले की, पोलिसांनी गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी न्यायवैद्यकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी विचारात न घेता घाईघाईने आत्महत्येचा निष्कर्ष काढून तपास बंद केला, असे याचिकेत म्हटले आहे. तर वडिलांचे प्रेमप्रकरण आणि आर्थिक फसवणुकीमुळे दिशा अस्वस्थ होती, असे क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले होते.