जिल्ह्यात आजारांची साथ

By Admin | Updated: August 10, 2015 23:34 IST2015-08-10T23:34:08+5:302015-08-10T23:34:08+5:30

जिल्ह्यातील सततच्या बदलत्या हवामानासह दूषित पाणीपुरवठ्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह ठाणे सिव्हील रुग्णालयात जुलैपर्यंत सुमारे ४७१ रुग्ण साथीच्या आजारांनी त्रस्त आहेत.

With the diseases of the district | जिल्ह्यात आजारांची साथ

जिल्ह्यात आजारांची साथ

- सुरेश लोखंडे,  ठाणे
जिल्ह्यातील सततच्या बदलत्या हवामानासह दूषित पाणीपुरवठ्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह ठाणे सिव्हील रुग्णालयात जुलैपर्यंत सुमारे ४७१ रुग्ण साथीच्या आजारांनी त्रस्त आहेत. यामध्ये गॅस्ट्रोसह अतिसार, हगवण, कावीळ, हिवताप, डेंग्यू आणि विषमज्वर आदी रुग्णांचा समावेश आहे.
सततच्या रिमझिम पावसासह ढगाळ वातावरणामुळे साथीचे आजार ग्रामीण भागासह शहरांतही डोके वर काढत आहेत. जुलैपर्यंत ठाणे सिव्हील रुग्णालयात झोपडपट्टीतील रहिवाशांसह परिसरातील गॅस्ट्रोच्या ४६ रुग्णांसह अतिसाराचे ४७, हगवणीचे ४८, कावीळचे सहा, विषमज्वरचे ५०, हिवतापाचे १०३ आणि डेंग्यूच्या सुमारे २९ रुग्णांवर उपचार झाले आहेत. यामध्ये अंबरनाथ, बदलापूर परिसरातील रुग्णांचाही समावेश आहे.
जून, जुलैच्या कालावधीत ग्रामीण भागातील शहापूर तालुक्यातील आडिवली गावात गॅस्ट्रोच्या साथीने ग्रामस्थांना हैराण केले आहे. त्यात सुमारे ३९ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे उघड झाले. याशिवाय, मुरबाडच्या किशोर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील पदूचीवाडीत अतिसाराची सुमारे आठ रुग्णांना लागण झाली.
तर, भिवंडीच्या आनगावमध्ये नागरिक सुमारे पाच दिवस गॅस्ट्रोच्या साथीने त्रस्त होते. त्या वेळी सुमारे २८ जणांना लागण झाली होती. याआधीदेखील फेब्रुवारीच्या कालावधीत भिवंडीच्या माळवडीत गॅस्ट्रोची साथ आली असता ४५ रुग्ण हैराण होते. तर, या तालुक्याच्या पाळखणे येथे अतिसाराने २२ रुग्ण हैराण झाले होते. येथील साथीला तत्काळ आटोक्यात आणण्यास जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास यश मिळाले.

उपाययोजनांमुळे काही प्रमाणात नियंत्रण
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील गावपाड्यांमध्ये ठिकठिकाणी आरोग्य कर्मचारी सतत तैनात आहेत. गावकऱ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना हाती घेतल्यामुळे साथीचे जलजन्य आजार आटोक्यात आणणे शक्य झाले. ग्रामपंचायतींच्या पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करून शुद्ध पाण्याच्या ग्रामपंचायतीला हिरवे कार्ड, पाण्याचे शुद्धीकरण करण्यास सक्षम असणाऱ्या ग्रामपंचायतीला पिवळे तर अक्षम ग्रामपंचायतीला रेड कार्ड देऊन त्यांचे वर्गीकरण केले आहे. त्यादृष्टीने तेथे लक्ष केंद्रित करून या पावसाळ्यात जलजन्य साथीच्या आजारांना आतापर्यंत तरी रोखण्यासाठी यश मिळाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. सोनावणे यांनी सांगितले.

Web Title: With the diseases of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.