मदनभाऊंशी चर्चा राहूनच गेली...

By Admin | Updated: October 29, 2015 00:11 IST2015-10-28T23:23:47+5:302015-10-29T00:11:11+5:30

अजित पवार : कुटुंबियांना आधार देण्याचे आश्वासन

Discussion with Madanbhoomi went on ... | मदनभाऊंशी चर्चा राहूनच गेली...

मदनभाऊंशी चर्चा राहूनच गेली...

सांगली : पक्ष वेगवेगळे असले तरी, आमची मैत्री कायम होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर एका महत्त्वाच्या राजकीय मुद्यावर चर्चा करण्याचे आम्ही निश्चित केले होते. पण त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ही चर्चा राहूनच गेली, अशी खंत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
अजित पवार यांनी बुधवारी दुपारी मदन पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी मदन पाटील यांच्या मातोश्री लीलाताई, पत्नी जयश्रीताई, कन्या सोनिया व मोनिका, जावई सत्यजित होळकर उपस्थित होते. जवळपास अर्धा तास त्यांच्याशी पवारांनी बातचित केली. दोन्ही कन्यांशीही चर्चा केली. ‘एक भाऊ म्हणून तुमच्या मदतीला कायम असेन’, असा दिलासा त्यांनी जयश्रीतार्इंना दिला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मदनभाऊ व आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरी, आमची मैत्री कायम होती. दोघांच्याही राजकीय कारकीर्दीत अनेक साम्यस्थळे आहेत. त्यामुळे ही मैत्री अधिक चांगली होती. त्यामुळे आर. आर. पाटील यांच्यानंतर मदनभाऊंच्या माध्यमातून आपणास दुसरा धक्का बसला. जिल्ह्यातील दोन महत्त्वाचे नेते अचानकपणे निघून गेल्याने फार मोठी हानी झाली आहे. ही हानी कधीही भरून निघणार नाही.
मदनभाऊ व आपण एकत्रित येणार होतो, असे जयंतरावांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्याबाबत पवार म्हणाले की, अशी चर्चा सुरू होती. मदनभाऊंची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आम्ही त्याविषयी चर्चा करणार होतो. पण त्यांच्या अचानक जाण्याने या सर्व चर्चा राहून गेल्या. मदन पाटील यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना, राजकीय गोष्टी करणे चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देत आहोत. राजकीय चर्चा पुढे होत राहतीलच.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू माने, सचिव मनोज भिसे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

जयंतराव-आबांमधील दरी
तासगाव-कवठेमहांकाळमधील राजकीय परिस्थितीबाबत पवार म्हणाले की, या तालुक्याची तसेच जिल्ह्याची जबाबदारी आता जयंत पाटील यांच्यावर आहे. तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश संभ्रमावस्थेतून झाला आहे. जयंत पाटील आणि आर. आर. पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्वीपासून एक दरी होती. ही दरी अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. शरद पवारांनी या सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची सूचना दिली होती. जयंतरावांनी तसे प्रयत्नही केले असतील. मात्र समोरूनही तसा प्रतिसाद मिळायला हवा. कोणी कितीही बदलायचा प्रयत्न केला आणि समोरच्या व्यक्तींनी आकस ठेवला, तर सूर जुळणार नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील दरी या गोष्टीस कारणीभूत आहे. यावर लवकरच आम्ही पक्षीय स्तरावर चर्चा करून निर्णय घेऊ.

Web Title: Discussion with Madanbhoomi went on ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.