कंत्राटी कामगारांची निराशा

By Admin | Updated: October 21, 2014 02:25 IST2014-10-21T02:25:15+5:302014-10-21T02:25:15+5:30

महापालिकेमधील कंत्राटी कामगारांना ११ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा महापालिकेने सप्टेंबरमध्ये केली होती.

The disappointment of contract workers | कंत्राटी कामगारांची निराशा

कंत्राटी कामगारांची निराशा

नवी मुंबई : महापालिकेमधील कंत्राटी कामगारांना ११ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा महापालिकेने सप्टेंबरमध्ये केली होती. परंतु हा प्रस्ताव शासन मंजुरीसाठी गेलेला असल्यामुळे प्रत्यक्षात ५,९०० रुपये बोनस दिला जाणार आहे. यामुळे कामगारांची प्रचंड निराशा झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने आचारसंहितेपूर्वी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) मंजूर करण्याचा निर्णय घेतला होता. कायम कर्मचाऱ्यांना १३ हजार रुपये व कंत्राटी कामगारांना ५ हजार ५०० रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मांडला होता. स्थायी समितीने यामध्ये ४०० रुपयांची वाढ सुचवून ही रक्कम १३ हजार ४०० व ५ हजार ९०० एवढी केली होती. या विषयावर निर्णय घेण्यासाठी १ सप्टेंबरला विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सर्वसाधारण सभेने कायम कर्मचाऱ्यांना १४ हजार व कंत्राटी कामगारांना ११ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. कंत्राटी कामगारांना राज्यात सर्वाधिक रक्कम घोषित झाल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
कंत्राटी कामगारांना ११ हजार रुपयांची घोषणा केली, परंतु जवळपास साडेआठ हजार कंत्राटी कामगारांना वाढीव रक्कम देण्यासाठी राज्य शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तशी परवानगी न आल्यामुळे अखेर १८ आॅक्टोबरला आयुक्तांनी आदेश काढून सर्व कंत्राटी कामगारांना ५,९०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी सूचना सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत. दिवाळी काही दिवसांवर आली असताना बोनस कमी मिळणार असल्याचे समजताच कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकाजवळ आल्यामुळे बोनसची रक्कम वाढविली होती का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The disappointment of contract workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.