शिक्षणात नापास, संपत्तीत झकास
By Admin | Updated: February 16, 2017 02:34 IST2017-02-16T02:34:57+5:302017-02-16T02:34:57+5:30
शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे मानले जाते. शिक्षण तुमचे ज्ञान, समाजातील प्रतिष्ठा व पत वाढवत असते, पण राजकारण

शिक्षणात नापास, संपत्तीत झकास
मुंबई : शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे मानले जाते. शिक्षण तुमचे ज्ञान, समाजातील प्रतिष्ठा व पत वाढवत असते, पण राजकारण क्षेत्र यास अपवाद ठरत आहे. आयुष्याची दिशा ठरवणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेपर्यंतही (दहावी) न पोहोचू शकलेले उमेदवार आज कोट्यधीश असल्याचे त्यांच्याच प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, यापैकी बहुतांशी उमेदवार राजकारणात सक्रिय असताना, त्यांचा व्यवसाय दिन-दुगणी और रात-चौगनी प्रगती करत असल्याचेही समोर आले आहे.
जनतेच्या प्रतिनिधीला प्रभागातील समस्यांची चांगली जाण असणे अपेक्षित असते. जनसंपर्क आणि विकासकामांच्या जोरावर नगरसेवक निवडून येत असतो, पण त्याचबरोबर शिक्षणाची जोड असल्यास त्याचा महापालिकेत दरारा व अधिकाऱ्यांवर अंकुश राहतो. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी पदवीधर व उच्चशिक्षित उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.
मात्र, आरक्षणातून पळवाट काढत आलेल्या घराणेशाहीमुळे हे उमेदवार सुशिक्षित असूनही कळसूत्री बाहुल्याच ठरल्या. २०१७च्या निवडणुकीत याहून वेगळे चित्र नाही. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे हे सर्वच मोठे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत असल्याने, सर्वच प्रभागांत शिक्षणाला दुय्यम स्थान देत उमेदवार उभे करण्यात आले आहेत, पण या उमेदवारांची आर्थिक प्रगती तोंडात बोटे घालण्यास लावणारी आहे. यापैकी काहींचे निवासस्थान मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्यांचे बाजारभाव अधिक असल्याचा युक्तिवाद काही जण मांडत आहेत. (प्रतिनिधी)