Join us  

डिसले गुरुजींनी घेतली राज्यपालांची भेट, 'या' विषयावर झाली सखोल चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 1:53 PM

रणजितसिंह डिसले गुरुजींची काही दिवसांपूर्वीच 'सदिच्छा दूत' म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य विकास व रोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीच्या वतीने ही नेमणूक करण्यात आली आहे

ठळक मुद्देरणजितसिंह डिसले यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावेळी, मुलींच्या शिक्षणासंदर्भात त्यांनी राज्यपालांशी चर्चा केली.

मुंबई - ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांच्या नावाची आता शिक्षणक्षेत्राला ओळख करुन द्यायची गरज नाही. जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींनी जागतिक स्तरावरील पुरस्कार मिळवून जगात महाराष्ट्राचं नाव मोठं केलंय. त्यामुळे, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून शिक्षणक्षेत्रात त्यांचं योगदान घेण्यात येत आहे. नुकतेच डिसले गुरुजींनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. 

रणजितसिंह डिसले यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावेळी, मुलींच्या शिक्षणासंदर्भात त्यांनी राज्यपालांशी चर्चा केली. राज्यातील मुलींचे शिक्षण अन् जनजागृतीविषयक धोरणांसंदर्भात चर्चा झाल्याचं डिसले गुरुजींनी म्हटलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.  

रणजितसिंह डिसले गुरुजींची काही दिवसांपूर्वीच 'सदिच्छा दूत' म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य विकास व रोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीच्या वतीने ही नेमणूक करण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण शिक्षणासाठी हाती घेतलेले उपक्रम नव उद्योजकांना प्रेरणादायी करणारे ठरतील, म्हणूनच हे उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावेत या हेतूने रणजितसिंह डिसले यांची सदिच्छा दूत म्हणून निवड केली आहे. सदिच्छा दूत म्हणून आता डिसले गुरुजी इनोव्हेशन सोसायटीचा विकास होण्यासाठी तळागाळातील विद्यार्थी, नव उद्योजक, प्राध्यापक, स्टार्टअप यांच्यापर्यंत योजनांचा प्रसार आणि प्रचार करणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. 

ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमीवरही निवड

सन २०१८ मध्ये राज्य शासनाच्या स्टार्टअप धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीकरता महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. यामार्फत राज्यातील सर्व घटकांकरता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबंधित विवीध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबवले जातात. यापूर्वी वार्के फाऊंडेशनने एक पुरस्कार सुरू असून, हॉलिवूडमधील अभिनेते अ‍ॅश्टन कुचर व मिला कुनिस यांच्यासह रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वर नेमणूक करण्यात आली आहे. 

लॉकडाऊनमध्येही विद्यार्थ्यांना शिकवले

सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत रणजितसिंह डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.

टॅग्स :रणजितसिंह डिसलेशिक्षणभगत सिंह कोश्यारी